पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ 

सकाळ वृत्‍तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

हप्त्याच्या रकमेत वाढ; मोबदला नाममात्र

मुंबई : पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान असली, तरी तिच्या लाभाबाबत पनवेल तालुक्‍यातील शेतकरी निरुत्साही असल्याचे पाहायला मिळत आहे. पनवेल तालुक्‍यात जवळपास आठ हजार ५०० हेक्‍टर जमिनीवर भाताची शेती केली जाते; मात्र पीक विमा योजनेत पैसे टाकण्यात शेतकरी इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे.

मागील वर्षी तालुक्‍यातील २७८ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत पैसे गुंतवले होते. परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे मागील वर्षी भात शेतीचे मोठे नुकसान होऊनसुद्धा फक्त १४ शेतकऱ्यांना नाममात्र मोबदला दिला गेल्याने शेतकरी संतापले. त्याचा परिणाम पीक विमा योजनेचे हप्ते भारण्यावर झाला आहे. याशिवाय मागील वर्षी एका हेक्‍टरसाठी भराव्या लागणाऱ्या २१० रुपयांवरून ८७० रुपयांपर्यंत हप्त्याची रक्कम वाढवण्यात आल्याने हा परिणाम झाला असल्याचीही शक्‍यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ४३ हजार ५०० प्रति हेक्‍टरसाठी भरावयाचा विमा हप्ता हा ८७० रुपये प्रति हेक्‍टर आहे.
.......
दोन वेळा मुदत वाढ देऊनही प्रतिसाद नाही 
पीक विमा योजनेला मिळणारा कमी प्रतिसाद तसेच इंटरनेट सुविधेत येत असणाऱ्या अडचणीमुळे पीक विमा भरण्यास दोन वेळा मुदत वाढ देऊनही शेतकऱ्यांचा हवा तेवढा प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने दिली आहे. मुदत वाढ देऊनही पनवेलमधील कृषी उत्पन्न बाजारात असलेल्या कृषी विभागातील कार्यालयात फक्त ११ शेतकऱ्यांनी अर्ज भरल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

कंपन्यांची बनवाबनवी 
मागील वर्षी परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे १२ पाडा येथील शेतकरी मोहन गावंड यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले होते. गावंड यांनी त्या वेळी ७२ गुंठे शेतीसाठी १४३ रुपये पीक विमा योजनेत भरले. मात्र, पीक विमा देणाऱ्या ओरियंटल कंपनीने केलेल्या सर्व्हेनुसार गावंड यांच्या फक्त सहा गुंठे शेतीच्या नुकसानभरपाईपोटी फक्त २५० रुपये देण्यात आले.

दरवर्षी नियमित पीक विमा योजनेचे हप्ते भरत होतो; मात्र कधीही नुकसान झाले नव्हते. मागील वर्षी नुकसान झाल्याने मोबदला मागितल्यावर नाममात्र मोबदला देऊन थट्टा करण्यात आल्याने कधीच विमा काढायचा नाही हा निर्णय घेतला आहे.
- मोहन गावंड, शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crop Insurance Scheme