लक्ष्मीदर्शनासाठी बॅंकेत झुंबड! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

मुंबई - शहरातील एटीएम केंद्रे शुक्रवारीही (ता. 11) सुरू न झाल्याने बॅंकांमधील गर्दी दुपटीने वाढली. परिणामी खातेदारांच्या हालात भर पडली. खिशातील पैसे संपत आले तरी हातात नव्या नोटा पडत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. 500-हजारच्या नोटा बदलण्यासाठी शुक्रवारीही बॅंका, एटीएम व टपाल कार्यालयांसमोर नागरिक व खातेदारांच्या रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे गुरुवारच्या तुलनेत गर्दी वाढली होती. बॅंकांनी जादा काऊंटर सुरू केले; परंतु ते गर्दीला अपुरे पडले. बाजारपेठेतील उलाढालही कमी झाल्याचे दिसून आले. 

रेल्वे, पालिका, एसटी, वीजबिल केंद्रे आदी अत्यावश्‍यक यंत्रणांनी जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत होती. ती मुदत वाढवण्याची मागणी खातेदार करीत आहेत. 

"एटीएम'ना उशीर होणार 
बॅंका सुरू झाल्यानंतर शुक्रवारपासून एटीएममध्ये पैसे मिळतील, असे सांगण्यात येत होते; मात्र आज अत्यंत कमी संख्येने एटीएम केंद्रे सुरू झाली. तिथेही फक्त 100 च्याच नोटा मिळत होत्या. खातेदारांनी सकाळीच एटीएमकडे मोर्चा वळवल्याने मोठी गर्दी झाली आणि रक्कमही काही तासांतच संपली. त्यामुळे खातेदार मोठ्या संख्येने बॅंकांकडे वळले. एटीएममधून 100 च्याच नोटा मिळत असल्याने नेहमीच्या तुलनेत 20 टक्केच व्यवहार तेथून झाल्यावर रक्कम संपली. एटीएम आजपासून सुरू होतील, अशी खात्री गुरुवारी देण्यात आली होती. मात्र, आता देशातील सर्व एटीएम केंद्रे सुरू होण्यास किमान दोन आठवडे लागतील, अशी माहिती "एटीएम'ची व्यवस्था पाहणाऱ्या कंपनीच्या प्रवक्‍त्याने दिली. 
 
पहिल्या दिवशी गर्दी होईल, असे गृहीत धरून अनेक खातेदार शुक्रवारी बॅंकेत गेले. परंतु, एटीएम व पोस्ट कार्यालयात पैसेच नसल्याने सर्वच बॅंकांमध्ये गुरुवारपेक्षाही तुफान गर्दी झाली. अर्थातच पैसे मिळण्यासाठी वेळ लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले. अनेक ठिकाणी बॅंकेतील गोंधळ कमी करण्यासाठी खातेदारांना शाखेबाहेर उन्हातच उभे करण्यात आल्यानेही त्यांचे हाल वाढले. काही बॅंकेत आपला क्रमांक येऊन पैसे मिळेपर्यंत तास-दीड तास लागत होता. काही बॅंकांनी पैसे भरणे, काढणे व बदलण्यासाठी वेगवेगळ्या रांगा केल्या होत्या. मात्र, कमी काऊंटर असलेल्या छोट्या बॅंकांमध्ये अशी व्यवस्था नसल्याने एकाच खिडकीवर सर्व कामे होत होती. त्रासलेले खातेदार पैसे भरण्यासाठी वेगळी रांग करण्याची मागणी करीत होते. 

भाजीबाजार थंडावला 
पैसे सहजासहजी मिळत नसल्याने किरकोळ बाजारातही नागरिक हातचे राखूनच खर्च करीत आहेत. परिणामी बाजारात मंदी होती. त्याचा सर्वांत जास्त फटका फळे, भाज्या आदी नाशवंत वस्तूंच्या बाजाराला बसला. ग्राहकांनी हात आखडता घेतल्याने मालाचा उठाव कमी झाला. व्यापाऱ्यांना खराब माल फेकून द्यावा लागत आहे. 

Web Title: crowd in bank