वसई-विरार शहरात बेवारस वाहनांची गर्दी ; वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त

Riksya.jpeg
Riksya.jpeg

वसई  ः हळूहळू लॉकडाऊन शिथिल केल्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. मात्र वसई-विरार शहरात रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या बेवारस वाहनांच्या गर्दीमुळे चालकांसह, वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढत असून यावर प्रशासनाने कृतिशील पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे. 

वसई-विरार शहर महापालिकेचे नवघर माणिकपूर, वसई, आचोळे, नालासोपारा, विरार, चंदनसार, वालीव, विरार, बोळींज पेल्हार असे नऊ प्रभाग आहेत. वसई-विरार शहरात बेवारस वाहने रस्त्याच्या कडेला धूळ खात अनेक महिने, वर्ष उभी आहेत. ज्यामुळे रस्ते व्यापले गेले आहेत. अशा वाहनांवर कारवाई करून निश्‍चित करण्यात येणाऱ्या जागेत ठेवली जातील असे धोरण 2019 साली आखले; परंतु अद्यापही कार्यवाही करण्यात आली नाही. तसेच रस्त्यांवर गॅरेज देखील थाटण्यात आले असून, वाहनांची दुरुस्ती केली जाते व दुरस्तीसाठी आलेली वाहने रस्त्याच्या दोन्ही दिशेला उभी केली जातात. यामुळे कोंडीचा सामना करावा लागतो. महापालिका प्रशासन जागा निश्‍चित करून त्या त्या प्रभागात वाहने जमा करणार होती;

परंतु "जैसे थे' परिस्थिती आहे. त्यामुळे मात्र वसई पूर्वेकडील औद्योगिक वसाहत, नवघर पूर्व, नालासोपारा, नवघर माणिकपूर, विरारसह आजूबाजूच्या परिसरातील मुख्य मार्गाला व अंतर्गत रस्त्याला अडथळे निर्माण होत आहेत. वाहने हटविण्यासाठी टोईंग, मनुष्यबळ व पुरेशा यंत्रणेची गरज आहे. तसेच ही वाहने ठेवण्यासाठी जागेची आवश्‍यकता आहे. महापालिका, पोलिस अशी संयुक्तपणे कारवाई करण्यात येणार होती; परंतु एक वर्ष उलटूनही प्रत्यक्षात कृती झाली नसल्याने बेवारस वाहनांमुळे भविष्यात कोंडी वाढण्याची शक्‍यता आहे. 

रस्त्याजवळ बेवारस वाहनांची संख्या अधिक आहे. वाहने उचलली जातात; परंतु मनुष्यबळ व यंत्रणा अपुरी आहे. तसेच वाहने ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण होत आहे. कोरोना संक्रमण कमी होताच तीव्र मोहीम हाती घेतली जाईल. 
- विलास सुपे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, वसई. 

(संपादन ः रोशन मोरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com