दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांच्या नशिबी फेऱ्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

कासा मंडळ अधिकारी कार्यालयात दाखले काढण्यासाठी मोठी गर्दी होत आहे; मात्र तलाठी अन्य कामांमध्ये व्यस्त असल्याने दाखल्यांसाठी ताटकळत बसावे लागत आहे.

मुंबई : दहावी, बारावीनंतर पुढील प्रवेशासह शैक्षणिक सवलतींसाठी विद्यार्थ्यांना, तर शेतकऱ्यांनाही शेतीकामांसह भरपाईच्या कामी सातबाऱ्यासह अन्य दाखल्यांची आवश्‍यकता भासत आले. त्यामुळे कासा मंडळ अधिकारी कार्यालयात दाखले काढण्यासाठी मोठी गर्दी होत आहे; मात्र तलाठी अन्य कामांमध्ये व्यस्त असल्याने दाखल्यांसाठी ताटकळत बसावे लागत आहे. याशिवाय गर्दीमुळे नंबर लागत नसल्याने विद्यार्थ्यांना रोज फेऱ्या माराव्या लागत आहेत. 
कासा येथील कार्यालय हे मध्यवर्ती कार्यालय असून येथे तलाठी सजा कासा, चारोटी, बापूगाव, दाभोण या तलाठी सजाचे काम चालते. या प्रत्येक तलाठी सजामध्ये 9 ते 10 महसूल गावे येतात; त्यामुळे सुमारे 30 ते 35 गावांची कामे याच कार्यालयातून केली जातात त्यामुळे एवढ्या गावातील लोक, शेतकरी मोठ्या प्रमाणात दररोज उत्पन्नाचे दाखले, सातबारा उतारा, जातीचा दाखला, रहिवासी दाखला मिळवण्यासाठी येत असतात. अनेकदा तलाठी वेळेत हजर नसतात. काहीजण उशिरा येतात; त्यामुळे नागरिकांचा खोळंबा होत आहे. सकाळपासून रांगा लावूनही त्यांना दाखल्यांशिवाय रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. काही तलाठी तालुक्‍याच्या ठिकाणी म्हणजे डहाणू मुख्य कार्यालयात असतात; त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. 
दुर्गम भागातील शेतकरी या दाखल्यासाठी दररोज जवळपास दीडशे ते दोनशेच्या संख्येने येत आहेत. शाळा-कॉलेज प्रवेश, पीककर्ज, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला यासाठी लोक त्रस्त झाले आहेत. कोणत्याही प्रकारच्या सूचना येथे लिहिलेल्या नसतात; त्यामुळे प्रशासनाने काही उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरीवर्ग करीत आहे. 

रिक्त जागांमुळे कामांवर परिणाम 
डहाणू तालुक्‍यात 51 तलाठ्यांची गरज आहे; तर सध्या 11 तलाठी कार्यरत आहेत. बऱ्याच जागा रिकाम्या आहेत. त्यामुळे एका तलाठ्याला चार ते पाच तलाठी सजांची कामे करावी लागत आहेत. सध्या तलाठी तालुक्‍याच्या ठिकाणी बसून डीएसपी डिजिटल सिग्नेचर प्रोग्राम, बुलेट ट्रेनची कामे, दप्तर अद्ययावत करणे यासाठी तहसील कार्यालयात बसत आहेत; त्यामुळे तलाठी सजाची कामे खोळंबत आहेत. 

आम्ही लांबून दाखल्यांसाठी दोन दिवसांपासून येत आहोत. माझ्या भावाला महाविद्यालयीन प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला पाहिजे; पण येथे आल्यावर कळते, की तलाठी आज येणार नाहीत. ते तालुक्‍याला गेले आहेत. रोज 50-60 रुपये खर्च करून यावे लागते, दाखला वेळेवर मिळाला नाही; तर हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळणार नाही. 
- किशोर उमतोल, ग्रामपंचायत सदस्य, सोनाळे 

डहाणू तालुक्‍यातील सर्व तलाठी हे कागदपत्र ऑनलाईन करणे, डिजिटल सिग्नेचर प्रोग्राम, बुलेट ट्रेनची माहिती, अद्ययावत दप्तर करणे या कामात आहेत. बहुतेक काम झाले आहे. चार-पाच दिवसांत सर्व काम पूर्ण होईल. त्यानंतर कोणताही दाखला लगेच मिळेल. थोडे दिवस त्रास सहन करावा लागेल. याशिवाय एक-दोन दिवस आपल्या कार्यालयात बसून दाखले द्या. बाकीचे दिवस तालुक्‍याच्या कामास या. याबाबत तलाठ्यांना सूचना केल्या आहेत. 
- सौरभ कटियार, प्रांत अधिकारी, डहाणू 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crowding for 7/12 certificate