जिभेला पाणी सोडणारा 'ओला काजूगर' खातोय भाव! लॉकडाउनमध्येही ग्राहकांकडून मागणी

अमित गवळे : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

  • ओले काजूगर खरेदीसाठी खवय्यांच्या उड्या
  • लॉकडाऊन आणि सरत्या हंगामामुळे मागणीत वाढ; किमती पुन्हा वधारल्या

पाली : ओले काजूगर म्हटले की, सगळ्यांच्याच जिभेला पाणी सुटते. आता त्यांचा हंगाम सरत चालला आहे. तसेच, काही प्रमाणात लॉकडाऊनही शिथिल झाले आहे. त्यामुळे काजूगर खरेदीसाठी खवय्यांच्या उड्या पडत आहेत. काही दिवसांपासून त्यांच्या उतरलेल्या किमती आता पुन्हा काही प्रमाणात वधारल्या आहेत.

सर्दी खासी ना कोरोना हुआ ! अरे बापरे 'या' आजाराचा वाहक तुमच्या फ्रिजमध्येच लपून बसलाय...

काजूचे फळ तयार होण्यापूर्वी येणारी बी काढून ती फोडून तिचा गर काढला जातो. जानेवारीअखेर ते मार्च महिन्याच्या ऐन हंगामात शेकडा 200 ते 300 रुपयांनी ओले काजूगर मिळत होते. तर वाटा (छोटा) 10 ते 15 रुपयांना मिळत होता. मात्र, लॉकडाऊनमध्ये ग्राहकच नसल्याने आदिवासींना नाईलाजाने ओले काजूगर 100 रुपये शेकडा व वाटा (छोटा) 5 ते 10 रुपयांनी विकावा लागला. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने आणि काजूगराचा हंगाम संपत चालल्याने काजूगर 125 ते 150 रुपये शेकडा तर वाटा (छोटा) 10 रुपयांनी मिळत आहेत. तरीदेखील खवय्ये मोठ्या उत्साहाने ओले काजूगर खरेदी करत आहेत. 

आदिवासींचे नुकसान
रायगड जिल्ह्यात डोंगराळ भाग व जंगलामध्ये काजूची झाडे विपुल प्रमाणात आहेत. जानेवारीच्या शेवटच्या अाठवड्यात काजूच्या बिया तोडून काजूगर अादिवासी महिला बाजारात विकण्यासाठी घेऊन येतात. यादरम्यान त्यांना चांगले पैसे मिळतात. मात्र ओल्या काजूगरांचा हंगाम कोरोनामुळे पूर्णपणे वाया गेल्याने आदिवासी बांधवांचे मोठे नुकसान झाले.

परप्रांतीय कामगार करताय मुंबईला 'जय महाराष्ट्र'; प्रशासनाकडूनही मिळतेय सहकार्य

जेवणात लज्जत वाढवणारा
चविष्ट ओल्या काजूचे गर वेगवेगळ्या प्रकारे खाल्ले जातात. काजूच्या गरांचा रस्सा किंवा सुकी भाजी करून खाल्ली जाते. तर पुलाव व बिर्याणीही केली जाते. मटण, मच्छी व सुक्या मासळीमध्ये टाकूनही खाल्ले जातात. असे हे चिविष्ट अाणि स्वादिष्ट ओले काजूगर जेवणाची लज्जत वाढवतात.

मेहनत अाणि हातांची दुरवस्था
दुर्गम, डोंगराळ भाग अाणि जंगलात काजूच्या बिया काढण्यासाठी अादिवासी बांधवांना अनवाणी उन्हातान्हात बिया काढण्यासाठी जावे लागते. या बियांना मोठ्या प्रमाणात चिक असतो. या बिया काढताना, तसेच कापताना ते हातात मोजे घालत नाही किंवा कोणतीही सुरक्षितता घेत नाही. त्यामुळे त्यांचे हात चिकामुळे पूर्णपणे खराब होतात. सरकारकडून त्यांना हातमोजे देणे; तसेच साह्य करणे गरजेचे आहे.

 

यंदा लॉकडाऊनमुळे काजूगर मुबलक प्रमाणात खाता आले नाहीत. मात्र, आता काही प्रमाणात काजूगर खरेदी करून खात आहोत. हंगाम संपत आल्यामुळे किमती वाढल्या आहेत.
- पल्लवी पाटील, शिक्षिका, माणगाव

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowds of customers buying for wet cashews