मान्सून सेल'मुळे महाडमध्ये ग्राहकांची झुंबड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019


महाडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असतो. अनेकदा शहरात पूरही येतो. त्यामुळे बाजारात मंदीचे सावट असते. जुना मालाची विक्री करण्याबरोबरच पुराच्या धोक्‍यामुळे अधिक माल न ठेवण्याकडे व्यापाऱ्यांचा कल असतो. त्यातच पावसाळ्यातील ग्राहकमंदी दूर करण्यासाठी कापड दुकानदार सेलची शक्कल लढविताना दिसतात. 

मान्सून सेल'मुळे महाडमध्ये ग्राहकांची झुंबड 

महाड (बातमीदार) : या वर्षी महाड शहरात पावसाचा जोर कमी असला, तरी ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या "मान्सून सेल'ची बाजारपेठेत चांगलीच बरसात झाली आहे. कपड्यांवर तर 10 ते 70 टक्‍क्‍यांपर्यंतची सूट देण्यात आली आहे. चपलांसह गृहोपयोगी साहित्यावरही मोठ्या प्रमाणात सूट दिली आहे. त्यामुळे बाजारपेठ गजबजली आहे. 

महाडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असतो. अनेकदा शहरात पूरही येतो. त्यामुळे बाजारात मंदीचे सावट असते. जुना मालाची विक्री करण्याबरोबरच पुराच्या धोक्‍यामुळे अधिक माल न ठेवण्याकडे व्यापाऱ्यांचा कल असतो. त्यातच पावसाळ्यातील ग्राहकमंदी दूर करण्यासाठी कापड दुकानदार सेलची शक्कल लढविताना दिसतात. 

या वर्षीही बाजारपेठेत लहान दुकानांपासून मोठ्या शोरूमपर्यंत सर्वांनीच सेलचे गाजर ग्राहकांना दाखविले आहे. त्याला ग्राहकराजाही भुलला आहे. ग्राहकांच्या मांदियाळीमुळे संध्याकाळी दुकानात पाय ठेवायलाही जागा नसते. 

शहरातील अनेक दुकानदारांनी दुकानाबाहेर मोठमोठी जाहिरातबाजी केली आहे. शंभर रुपयांपासून या सेलला सुरुवात होते. 300, 350 रुपयांना तीन टी-शर्ट, एक शर्टवर एक शर्ट मोफत, पॅंटवर शर्ट मोफत, 250 रुपयांत दोन बेडशिटस, 300, 500 रुपयांत पॅंट, रजया, चादरी, शाळेचे गणवेश अशा मोठ्या ऑफर्स आहेत. 

महिलांना भुरळ पाडणाऱ्या पैठणीवर पैठणी मोफत, साड्या आणि ड्रेसमटेरियल; तसेच महिलांच्या वेशभूषेच्या अनेक ऑफर्स बहुसंख्य दुकानदारांनी जाहीर केल्या आहेत. महिलांनाही आपली पसंती करण्यासाठी अनेक दुकानांमध्ये वाव आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुले व मुलींसाठीही या सेल्समध्ये मोठ्या प्रमाणात कपडे आहेत. 

आणखी 15 दिवस हे भाव असेच राहणार आहेत. ब्रॅंडेड कापड दुकानातही सेलची हवा आहे. शहरातील महात्मा गांधी मार्ग, छत्रपती शिवाजी मार्ग या मार्गांवरील कापड दुकानांत सध्या ग्राहकांची जोरदार गर्दी आहे. काही दुकानात तर चक्क चप्पल, दप्तरे व छत्र्यांवरही मोठ्या प्रमाणात सवलत असल्याने ग्राहक याचाही फायदा घेत आहेत. 

महाड बाजारपेठेत हव्या त्या वस्तू कमी दरात मिळत असल्याने भरघोस खरेदीचा आनंद घेता येतो. 
- हर्षिका पाटील, ग्राहक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowds of customers in Mahad