कल्याण : खाडी किनाऱ्यांचा विकास योजनेला अडचणी

सुचिता करमरकर
सोमवार, 30 एप्रिल 2018

या खाडी किनाऱ्यांचा चौपाटी प्रमाणे विकास करण्याची योजना प्रस्तावित आहे. डोंबिवली खाडी किनारा विकसित करण्यासाठी स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी दहा कोटींचा निधीही सरकारकडून आणण्यात यश मिळवले आहे. मात्र जर अशा रितीने किनाऱ्यांवर अनधिकृत बांधकामे झाली तर या योजनेत अडचणी येण्याची भीती आहे.

कल्याण : कल्याण तसेच डोंबिवली शहरालगत असलेल्या खाडी किनाऱ्यांचा विकास करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली जात आहे. मात्र या योजनेला अडचणी उत्पन्न होतील अशाप्रकारची अनधिकृत बांधकामे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि मेरीटाइम बोर्डाचे या अनधिकृत बांधकामांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करत येथे अनधिकृतपणे जनावरांचे गोठे बांधले जात आहेत.

काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी जोरदार मोहीम राबवत कल्याण आणि डोंबिवली खाडी किनारी होत असलेल्या अवैध रेती उपसा बंद पाडला होता. पुन्हा हा व्यवसाय येथे सुरु होऊ नये यासाठी त्यांचे साहित्यही जप्त करण्यात आले होते. मात्र अवघ्या तीन चार महिन्यांतच या ठिकाणी आता जनावरांच्या गोठ्याचे काम सुरु झाले आहे. ही जागा मेरीटाइम बोर्डाच्या अखत्यारीत आहे. ज्या ठिकाणी हे काम होत आहे तेथून काही अंतरावरच बोर्डाचे कार्यालय आहे. तेथील अधिकारी या बांधकामांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत का? असा प्रश्न तक्रारदार कौस्तुभ गोखले यांनी विचारला आहे. संबंधित विभागाने यावर वेळीच कारवाई केली नाही तर ही बाब राष्ट्रीय हरित लवादाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे. या गोठ्यांमुळे खाडीतील प्रदुषण वाढण्याची भीती आहे.

या खाडी किनाऱ्यांचा चौपाटी प्रमाणे विकास करण्याची योजना प्रस्तावित आहे. डोंबिवली खाडी किनारा विकसित करण्यासाठी स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी दहा कोटींचा निधीही सरकारकडून आणण्यात यश मिळवले आहे. मात्र जर अशा रितीने किनाऱ्यांवर अनधिकृत बांधकामे झाली तर या योजनेत अडचणी येण्याची भीती आहे.

Web Title: CRZ rule in Thane