सीएसएमटी ते पनवेल दोन मिनिटाला एक लोकल!

श्‍वेता चव्हाण 
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेलपर्यंतची लोकल पुढील तीन वर्षांत दोन ते मिनिटांच्या अंतराने धावणार आहे. त्यानंतर सर्वच मार्गावरील लोकल याच पद्धतीने धावतील. यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टीम (सीबीटीसी) ही अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा उभारणार आहे.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेलपर्यंतची लोकल पुढील तीन वर्षांत दोन ते मिनिटांच्या अंतराने धावणार आहे. त्यानंतर सर्वच मार्गावरील लोकल याच पद्धतीने धावतील. यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टीम (सीबीटीसी) ही अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा उभारणार आहे.

या प्रकल्पासाठी पाच हजार ९२८ कोटी रुपये खर्च असून यंदाच्या अर्थसंकल्पात ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सध्या प्रत्येक चार ते पाच मिनिटांनंतर एक लोकल असते. तासाला १८ लोकल फेऱ्या होतात; मात्र या अत्याधुनिक सिग्नल यंत्रणेमुळे दोन ते तीन मिनिटांच्या अंतराने लोकल धावणार असून तासाला सहा लोकल फेऱ्या वाढतील. या सिग्नल यंत्रणेमुळे गाड्यांचा वेगही वाढणार आहे.

चर्चगेट-विरार, सीएसएमटी-पनवेल आणि सीएसएमटी-कल्याण अशा तिन्ही उपनगरी रेल्वेमार्गांवर ‘सीबीटीसी’ सिग्नल यंत्रणा राबवण्यात येणार आहे. सीबीटीसी यंत्रणा राबवण्यासाठी आवश्‍यक असणारा अभ्यास करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ लिमिटेडने (एमआरव्हीसी) सुरुवात केली आहे. यासाठी लवकरच ‘एमआरव्हीसी’ एका खासगी कंपनीची नियुक्ती करणार आहे. 

अशी असेल यंत्रणा...
सीबीटीसी सिग्नलमुळे मोटरमनला पुढील ट्रेन प्रत्यक्ष पाहण्याची गरज भासणार नाही; त्याऐवजी लोकलच्या केबिनमधील स्क्रीनवर लोकलचा अंदाज येईल. गाडीच्या मागे व पुढे असलेल्या गाड्यांची स्थिती आणि त्या गाड्यांमधील अंतराची पूर्ण माहिती मिळणार आहे. याकरता गाडीच्या पुढील व मागील भागात सेन्सर बसवण्यात येईल. त्यामुळे दोन गाड्यांमधील अंतर निर्धारित अंतरापेक्षा कमी झाल्यास गाड्यांमधील स्वयंचलित ब्रेक लागून गाडी सुरक्षित अंतरावर थांबेल. त्यामुळे गाड्यांचा वेग वाढला, तरी अपघाताची शक्‍यता टळेल. तसेच, केंद्रीय नियंत्रण कक्षातून स्वयंचलित पद्धतीने लोकलवर नियंत्रण ठेवणे शक्‍य होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CSMT to Panvel local train