महामार्गावरील रोपलागवडीला स्थगिती 

महामार्गावरील रोपलागवडीला स्थगिती 

नवी मुंबई -शीव-पनवेल महामार्गाच्या दुतर्फा लावण्यात येत असलेल्या सहा हजार रोपलागवडीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने स्थगिती दिली. महामार्गाला समांतर असणाऱ्या सेवा रस्त्याची झालेली दुर्दशा आणि महामार्गाचे हस्तांतर प्रलंबित असताना सुशोभीकरणावर खर्च कशासाठी, असा आक्षेप सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी घेतला. त्यामुळे हा प्रस्ताव स्थायी समिती सभापती नवीन गवते यांनी स्थगित केला. 

महापालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावरील सात किलोमीटरच्या पट्ट्यात शोभेची रोपे लावून महामार्गाचे दुतर्फा सुशोभीकरण केले जाणार होते; मात्र या सुशोभीकरणाबाबत शिवसेनेच्या नगरसेविका सरोज पाटील यांनी प्रश्‍न उपस्थित केले. उद्यान विभागाचे उपायुक्त नितीन काळे हे पाटील यांना प्रश्‍नांची उत्तरे देत होते. त्यादरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक रवींद्र इथापे यांनी आक्षेप नोंदवला. शिरवणे एमआयडीसी आणि नेरूळ एमआयडीसीला जाणाऱ्या सेवा रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या कंपन्यांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. उलट सुशोभीकरणावर प्रशासन पैसे उधळत असल्याचा आरोप इथापे यांनी केला. स्वच्छ भारत अभियानादरम्यान प्रशासनाने कशी विकासकामांची निविदा न काढता कामे केली अशी शेरेबाजी केली. महामार्ग आपल्याकडे हस्तांतर करीत नसतील तर मग सुशोभिकरणाचे आपल्याला एवढे काय पडले आहे असा प्रश्‍न उपस्थित केला. मात्र काळे यांना पूर्ण माहिती घेऊन बोलून द्या अशी शिवसेनेचे नगरसेवक बहादुर बिस्ट यांनी विनंती केली; परंतु गवते यांनी हा प्रस्ताव सुधारित तयार करून आणावा, अशा सूचना प्रशासनाला देत हा प्रस्ताव तात्पुरता स्थगित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com