गोवर्धनी माता मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

नवी मुंबईतील किल्ले गावठाण बेलापूर येथील पुरातन अशा पेशवेकालीन श्रीगोवर्धनी माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

नवी मुंबई : नवी मुंबईतील किल्ले गावठाण बेलापूर येथील पुरातन अशा पेशवेकालीन श्रीगोवर्धनी माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

श्रीगोवर्धनी माता मंदिरात हळदी-कुंकू समारंभ तसेच पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांचा भजन-कीर्तन, नाचगाणी कार्यक्रम, संगीत नृत्य, मंगळागौर नृत्य अशा अनेक कार्यक्रमांत शेकडो महिलांनी उत्साहात भाग घेतला. या वेळी किल्ले गावठाण ग्रामस्थ महिला मंडळ, बेलापूर ग्रामस्थ महिला मंडळ, श्री गोवर्धनी सामाजिक सेवा महिला मंडळाच्या महिला सदस्यांनीही सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. पारंपरिक वेशभूषा करण्यात आलेल्या असंख्य महिलांना या वेळी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

यावेळी आमदार म्हात्रे यांनी सांगितले, की नवी मुंबईतील दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीचे पुरातन पेशवेकालीन एकमेव मंदिर म्हणजे श्री गोवर्धनी मातेचे मंदिर अशी अख्यायिका आहे. गोवर्धनी मातेची प्राणप्रतिष्ठापना पेशवेकाळात झाली असून, नवी मुंबईतील नव्हे, तर संपूर्ण पंचक्रोशातील ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांतील सर्व भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे. नवी मुंबईतील सोनार, ब्राह्मण, आगरी-कोळ्यांची कुलदेवता असलेली भक्तांच्या हाकेला धावणारी व सर्व मनोकामना पूर्ण करणारी अशी श्री गोवर्धनी मातेची जनमानसात ख्याती आहे. अशा या जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोवर्धनी माता मंदिरात दरवर्षीप्रमाणे या वर्षीही नवरात्र उत्सव साजरा होत आहे. महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ, पारंपरिक वेशभूषा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात उत्साहित महिलांचा सहभाग पाहून आनंद वाटत आहे.

श्री गोवर्धनी मातेचे मंदिर हे निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या निसर्गरम्य टेकडीवर वसलेले. मंदिराच्या जवळच शिवकालीन किल्ले असून, संपूर्ण परिसर हिरवळीने नटलेला आहे. मंदिराच्या पाठीमागे विस्तीर्ण असा समुद्र लाभलेला आहे. अशा या पुरातन पेशवेकालीन मंदिराचा जीर्णोद्धार बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी गेल्या १२ वर्षांपूर्वी केला असून, सुंदर भव्य असे मंदिर दक्षिणात्य पद्धतीने उभारले आहे.

सोनार, ब्राह्मण, आगरी-कोळी समाजाची कुलदेवता
श्री गोवर्धनी मातेचे मंदिर हे दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीचे पुरातन पेशवेकालीन एकमेव मंदिर आहे. गोवर्धनी मातेची प्राणप्रतिष्ठा पेशवेकाळात झाली असून, नवी मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांतील सर्व भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे. तसेच नवी मुंबईतील सोनार, ब्राह्मण, आगरी-कोळी समाजाची कुलदेवता म्हणून श्री गोवर्धनी मातेची जनमानसात ख्याती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cultural program at Govardhani Mata Temple