देशात सध्या अघोषित आणीबाणी! - प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

...तर निवडणुकीनंतरसुद्धा आघाडी
काँग्रेसला रा. स्व. संघाशी लढायचे नसल्यास आम्ही आमच्या स्वतंत्र वाटेने जायला मोकळे आहोत. आमच्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे काँग्रेसने लवकरात लवकर संघाविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे ते म्हणाले. काँग्रेसबरोबर निवडणूकपूर्व आघाडी जरी झाली नाही, तरी निवडणुकींनतर सुद्धा आघाडी होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई -  देशात सध्या अघोषित आणीबाणी लागू आहे. केंद्र व भाजपची सत्ता ज्या ज्या राज्यात विराजमान आहे, तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवला जात आहे. त्यामुळेच लेखक, कलावंत यांना सरकारविरोधी मते सार्वजनिक व्यासपीठावरून मांडू दिली जात नाहीत. दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या भाषणात त्यामुळेच व्यत्यय आणण्यात आला, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर केली.

रविवारी पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर म्हणाले, सरकारविरोधी आवाज काढू दिला जात नाही. हे हुकूमशाही वृत्तीचे द्योतक आहे. आम्ही मनमानी करू शकतो हे दाखवण्याचे तंत्र अवलंबले जात आहे. पालेकर हे हिटलरशाही अजेंड्याचे बळी आहेत, असे सांगत जनतेने विचार करण्याची वेळ आली आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसची निवडणुकीसंदर्भातली चर्चा संघाच्या मुद्द्यावर अडली आहे. संघाला घटनात्मक चौकटीत आणण्यासाठी काय उपाययोजना करणार, ते काँग्रेसने स्पष्ट  केले पाहिजे, असे आंबेडकर यांनी म्‍हटले.

...तर निवडणुकीनंतरसुद्धा आघाडी
काँग्रेसला रा. स्व. संघाशी लढायचे नसल्यास आम्ही आमच्या स्वतंत्र वाटेने जायला मोकळे आहोत. आमच्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे काँग्रेसने लवकरात लवकर संघाविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे ते म्हणाले. काँग्रेसबरोबर निवडणूकपूर्व आघाडी जरी झाली नाही, तरी निवडणुकींनतर सुद्धा आघाडी होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Currently undeclared emergency in the country says prakash ambedkar