चिनी फळांना ग्राहकांची पसंती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

कृषी उत्पन्न बाजार समितीत चिनी फळांचा शिरकाव झाला आहे. फुजी सफरचंद, ड्रॅगनसाठी ग्राहक गर्दी करीत आहेत...

नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजारात देशातून आणि परदेशातून मोठ्या प्रमाणात फळांची आवक होते. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह चीनहूनही मोठ्या प्रमाणात फळे आपल्या बाजारात येत आहेत. आपल्या बाजारात चीनच्या वस्तूंना चांगली मागणी असल्याचे लक्षात घेत चीनने आता फळ बाजारातही शिरकाव केला आहे. तसेच आकर्षक फळे आणि कमी दरामुळे त्यांना चांगली मागणीही आहे.

वाशीतील घाऊक फळ बाजारात सर्व ठिकाणाहून वेगवेगळ्या फळांची आवक होते. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमधून मोठ्या प्रमाणात सफरचंदांची आवक वर्षभर होते. त्याचबरोबर इतर हंगामी फळेही बाजारात येतात. त्यातच सध्या चीनहून वेगवेगळ्या प्रकारची फळे बाजारात येत आहेत. सध्या त्यांचे प्रमाणही वाढले आहे. चीनहून गुलाबी रंगाचे फुजी सफरचंदांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यात आता पियर, मोठी द्राक्षे, लिंबाच्या आकाराची संत्री, ड्रॅगन फ्रूट यांचेही प्रमाण वाढले आहे. आपल्याकडे लहान आकाराची द्राक्षे येतात, तर चीनने मोठी लिंबाच्या आकाराची द्राक्षे बाजारात आणली आहेत. आपल्याकडे संत्री मोठी आहेत, तर चीनहून लिंबाच्या आकाराची संत्री बाजारात येत आहेत. तेथील ड्रगन फ्रूट आणि पियरलाही बाजारात मोठी मागणी आहे. बाजारात येणाऱ्या एकूण मालापैकी २० ते २५  टक्के माल परदेशी असतो. त्यात सध्या १० टक्के फळे चीनहून येत आहेत. मात्र, ही फळे जास्त टिकत नाहीत. तरीही कमी किंमत आणि दिसायला आकर्षक असल्याने बाजारात त्यांना मागणी आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Web Title: customers prefer Chinese fruit