
Cyber Crime : सायबर गुन्हेगारांकडून भाजप नेते आशिष शेलारांना फसवणूकीचा प्रयत्न
मुंबई - भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध सायबर फसवणूक केल्याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 30 ऑगस्ट रोजी वांद्रे पोलिस ठाण्यात शेलार यांचे स्वीय सहाय्यक नवनाथ सातपुते यांनी गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9.19 वाजता आमदार आशिष शेलार यांना अज्ञात फोन क्रमांकावरून कर्जाची रक्कम भरण्यासाठी मेसेज आला. तसेच मेसेजमध्ये पैसे दिले असल्यास दुर्लक्ष करा असे सांगत एक वेबलिंक दिली होती. लिंक ओपन केल्यावर आमदार शेलार यांना आणखी एक मेसेज दिसला की यात कर्ज सेटलमेंट करण्यासाठी 7700 रुपये द्यावे लागतील असे सांगितले होते.
मात्र, आमदार शेलार यांनी कोणतेही कर्ज घेतले नव्हते. दरम्यान, आमदार शेलार यांना दोन अज्ञात फोन नंबरवरून फोन कॉल आले आणि त्यांनी कर्जाची रक्कम भरण्याची विनंती केली. हा घोटाळा असल्याचे शेलारांच्या लक्षात आले आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.
कार्यात व्यस्त असल्याने आमदार शेलार यांच्या सहाय्यकांनी त्यांच्यावतीने खटला दाखल केला. आमदार आशिष शेलार या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, 'मी कोणतेच कर्ज घेतलेले नाही किंवा कोणाचाही जामीनदार म्हणून काम केलेले नाही. याची पोलिसांनी चौकशी करावी. कारवाई व्हावी यासाठी मी गुन्हा दाखल केला आहे.' वांद्रे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.