उपनगरात आणखी एक सायबर पोलिस ठाणे 

मंगेश सौंदाळकर - सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 6 मार्च 2017

मुंबई - वांद्रे येथील सायबर पोलिस ठाण्यावरील वाढता ताण कमी करण्यासाठी उपनगरात दुसरे सायबर पोलिस ठाणे सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) ऑनलाईन पाहण्याची व्यवस्थाही लवकरच करण्यात येणार आहे. 

मुंबई - वांद्रे येथील सायबर पोलिस ठाण्यावरील वाढता ताण कमी करण्यासाठी उपनगरात दुसरे सायबर पोलिस ठाणे सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) ऑनलाईन पाहण्याची व्यवस्थाही लवकरच करण्यात येणार आहे. 

वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी गृहविभागाने पावले उचलली आहेत. सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी मुंबई पोलिसांचे वांद्रे येथे सायबर पोलिस ठाणे आहे. तेथे सायबर गुन्ह्यांविषयीच्या तक्रारी घेऊन येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. वांद्रे पोलिस ठाण्यावरचा ताण कमी करण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यातही सायबर गुन्हे नोंदवावेत, असे आदेश गृहविभागाने दिले होते. स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतरही अनेकजण तीच तक्रार घेऊन सायबर पोलिस ठाण्यातही जातात. त्यामुळे तेथील ताण वाढतो. दुसरे सायबर पोलिस ठाणे सुरू करण्याबाबत काही दिवसांपूर्वी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यासाठी जागेची पाहणीही करण्यात आली असून प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. 

नागरिकांना एफआयआर ऑनलाईन पाहण्याची व्यवस्था करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने गृहविभागाला आदेश दिले होते. त्याचेही तांत्रिक काम पूर्ण झाले आहे, तर अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आहे. एमपीआयएस प्रकल्पांतर्गत पोलिस ठाणी ऑनलाईन जोडण्यात येणार आहेत. पोलिस ठाण्यात संगणक ठेवून त्यावर महत्त्वाची माहिती, आदेश पोलिस अधिकाऱ्यांना ऑनलाईन पाहता येतील, असे एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले. 

सायबर गुन्हे 
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या आकडेवारीनुसार 2015 मध्ये राज्यात दोन हजार 195 सायबर गुन्हे दाखल झाले होते. त्यात आर्थिक फसवणुकीचे 682, फसवणुकीचे 354, बॅंक फसवणुकीचे 145, वैयक्तिक वादाचे 21 आणि महिला अपमानचे 234 गुन्हे होते. ते करणाऱ्या 825 जणांना अटक करण्यात आली होती. 

Web Title: cyber police station in the suburbs