सायबर सुरक्षेचे मुख्यालय नवी मुंबईत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

सायबर सुरक्षा प्रकल्पाच्या मुख्यालयासाठी नवी मुंबईतील जागा मिलेनियम बिझनेस पार्कमधील जागा ताब्यात... गुन्ह्याच्या तपासाला वेग येणार 

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाच्या मुख्यालयासाठी नवी मुंबईतील महापे औद्योगिक विकास महामंडळाच्या मिलेनियम बिझनेस पार्कमधील जागा सोमवारी ताब्यात मिळाली. त्या ठिकाणी ‘महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पा’चे सुसज्ज व अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त मुख्यालय उभारण्यात येणार असून राज्यातील सायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी आधुनिक यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.

राज्य शासनाने सुमारे एक लाख आठ हजार चौरस फूट जागा ‘महाराष्ट्र सायबर’च्या ताब्यात दिली आहे. त्या ठिकाणी सायबर सुरक्षा प्रकल्पाची चार मुख्य केंद्रे सुरू करण्यात येणार असून याद्वारे गुन्हे अन्वेषणासाठीचे तांत्रिक सहाय्य केंद्र, गुन्हे अन्वेषणासाठी आवश्‍यक तंत्रज्ञान सहायक विश्‍लेषण केंद्र, सर्ट-महाराष्ट्र आणि प्रशिक्षण केंद्र आदींचे कामकाज तेथून होणार आहे.

सायबर सुरक्षा प्रकल्पामुळे राज्यातील पोलिस दलास अत्याधुनिक सायबर प्रणाली व भविष्यात येणारे आधुनिक यंत्रणा पुरवण्यात येणार आहेत. 

सायबर गुन्हे तपासाचा वेग वाढणार
महापे औद्योगिक वसाहतीमधील बिझनेस पार्कमध्ये महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाच्या मुख्यालयासाठी जागा मिळाल्यामुळे डिजिटल युगात उद्‌भवणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र सायबर सज्ज झाली आहे. सायबर गुन्ह्यांचा तपास वेगाने होण्यास मदत होणार आहे. 

सायबर गुन्ह्यांविरुद्ध कॉर्पोरट कंपन्यांना लाभ
सायबर सुरक्षा प्रकल्पामुळे सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात अधिक परिणामकारक, सुसूत्रता व अत्यंत कमी वेळात गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात येणार असल्याने सर्वसामान्यांबरोबर विविध कार्पोरट कंपन्यांनाही सायबर गुन्ह्यांविरुद्ध मदत होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cyber security Headquarters of at Navi Mumbai