सुधागड तालुक्यात चक्रीवादळ व मुसळधार पाऊस; आंबा पिकाला जबर फटका

सुधागड तालुक्यात चक्रीवादळ व मुसळधार पाऊस; आंबा पिकाला जबर फटका

पाली : सुधागड तालुक्यात चक्रीवादळ व मुसळधार पावसामुळे 48 लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच 436 घरांची पडझड झाली असून, 330 शेतकऱ्यांच्या आंबा पिकाला फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना लवकर भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

वादळी पावसामुळे येथील अनेक गावे, आदिवासीवाड्या, शाळा व मंदिरांना मोठा फटका बसला. याबरोबरच शेती उत्पादन व आंबापिकाची मोठी नासाडी झाल्याने बागायतदार व शेतकरी चिंतातुर झाला आहे. अनेक गावे व आदिवासी वाड्यापाड्यात मोठी पडझड होऊन प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील 100 गावांपैकी 75 गावांत नुकसान झाल्याची माहिती मिळते. 
पालकमंत्री अदिती तटकरे व रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या आदेशाने पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यात आले. आत्तापर्यंत झालेल्या पंचनाम्यात नुकसानग्रस्त 436 घरांचा समावेश असून तब्बल 25 लाख इतके नुकसान झाल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे. याबरोबरच अतिवृष्टीत नुकसान झालेले शेतीपीक व आंबापिकाचे पंचनामे कृषी विभागाच्या माध्यमातून होत आहेत. 

या गावांचा समावेश
आंबा पिकाचे नुकसान झालेल्या गावांमध्ये महागाव, चंदरगाव, गोंदाव, हातोंड, परळी, जांभूळपाडा, पेडली, नवघर, खवली, कुंभारशेत,  राबगाव, पाच्छापूर, नांदगाव, आपटवणे,आतोने,  नागशेत, धोंडसे, वावलोली, भार्जे, सिद्धेश्वर खुर्द, सिद्धेश्वर बुद्रुक, कासारवाडी, कळंब, कौलोशी आदी गावांचा  समावेश आहे. यामध्ये 330 आंबा बागायतदारबाधित शेतकऱ्यांचा समावेश असून 23 लाख इतके नुकसान झाले आहे. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग, तलाठी व ग्रामसेवक आदींच्या सहभागाने पंचनामे केले जात आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून योग्य ती नुकसानभरपाई मिळावी यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. 
- जे. बी. झगडे, कृषी अधिकारी, सुधागड तालुका

सुधागड तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. एकही नागरिक नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही. नागरिकांनी कुणाचे पंचनामे शिल्लक असल्यास तातडीने प्रशासनाला माहिती द्यावी आणि पंचनामे करून घ्यावेत.
- दिलीप रायन्नावार, तहसीलदार सुधागड, पाली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com