कार्बन डाय ऑक्साईड गॅसचे सिलिंडर फुटून एक ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

कार्बन डाय ऑक्साईड गॅसचे सिलिंडर अचानक फुटले. फुटलेल्या सिलिंडरचा पत्रा बिपीनकुमार याच्या पोटात घुसला...

नागाव -  शिरोली औद्योगिक वसाहतीमधील के इंडस्ट्रीयल गॅसेस प्रा. लि. या कंपनीत कार्बन डाय ऑक्साईड गॅसचे सिलिंडर फुटून एक जण जागीच ठार झाला. बिपीनकुमार आर्या (वय ३०, सद्या रा. कंपनीत, मुळ रा. अलिबाग, मथूरा, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. अमित वंजारी  (३०, निगवे दुमाला) व वसंत परीट (४५, मलकापूर) हे दोघे जखमी आहेत. ही दुर्घटना आज सकाळी अकरा वाजता घडली.  

याबाबत घटनास्थळी व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शिरोली औद्योगिक वसाहतीमधील सकाळ प्रेसच्या मागील बाजूस के इंडस्ट्रीयल गॅसेस प्रा. लि. ही इंडस्ट्रीयल गॅसेसचा पुरवठा करणारी कंपनी आहे. या कंपनीमध्ये ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे दोन प्रकारचे गॅस तयार केले जातात. या व्यतिरिक्त ऑरगाॅन, कार्बन डाय ऑक्साईड, डीझाॅल अॅसिटीलिन सातारा येथून सिलिंडर भरून शिरोली एमआयडीसी येथून डिसपॅच केले जाते. 

आज सकाळी साडेनऊ वाजता सातारा येथून कार्बन डाय ऑक्साईड गॅस भरलेले सिलिंडर घेऊन टेम्पो आला. अमित व वसंत हे टेम्पोतील सिलिंडर उतरून घेत होते. तर बिपीनकुमार आर्या हा सिलिंडरचे क्रमांक लिहून घेत होता. त्याचवेळी कार्बन डाय ऑक्साईड गॅसचे सिलिंडर अचानक फुटले. फुटलेल्या सिलिंडरचा पत्रा बिपीनकुमार याच्या पोटात घुसला. यामध्ये तो जागीच ठार झाला. तर सिलिंडर उतरून घेणारे अमित वंजारी व वसंत परीट हे जखमी झाले.

जखमींना कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: A cylinder of carbon dioxide gas was broken and one killed