भाजपशिवाय सत्ता स्थापन करा!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

भाजप महत्त्व देत नसल्यास ‘कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा’ उक्तीनुसार शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन करावे, अशी मागणी मुंबईतील डबेवाल्यांनी केली आहे.

मुंबई : सत्तेतील वाट्यावरून शिवसेना-भाजपमध्ये जोरदार जुंपल्यामुळे दोन्ही पक्ष समाजमाध्यमांवर ट्रोल होत आहेत. भाजप महत्त्व देत नसल्यास ‘कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा’ उक्तीनुसार शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन करावे, अशी मागणी मुंबईतील डबेवाल्यांनी केली आहे.

मुंबई डबेवाला असोसिएशनने विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीला पाठिंबा दिला होता. महायुतीला बहुमत मिळाले; मात्र निवडणुकीचा निकाल लागून आठवडा झाला, तरी सरकार स्थापन होत नाही. भाजप शिवसेनेला महत्त्व देत नसल्याचेच दिसते. असा अपमान शिवसेनेने खपवून घेऊ नये. सत्तास्थापनेसाठी शिवसेनेने गरज भासल्यास काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घ्यावी. भाजपची चुकूनही मदत घेऊ नये. यापुढे भाजपला मदत करू नये, असा सल्ला डबेवाल्यांनी शिवसेनेला दिला आहे.
 
पहिल्यापासूनच डबेवाल्यांनी शिवसेनेला साथ दिली आहे. डबेवाल्यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही शिवसेना-भाजपचा प्रचार केला. आता भाजप वेगळे वागत आहे. शिवसेनेने कुणाचीही मदत घेऊन मुख्यमंत्री बनवावा; पण भाजपला संधी देऊ नये, असे आवाहन मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केले. मागील वेळी शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा दिला होता. ते आता शिवसेनेला पाणी पाजण्याच्या गोष्टी करत आहेत, असेही तळेकर म्हणाले. 

भाजपचा भस्मासुर मित्रपक्षांना संपवतो आहे. हा भस्मासुर शिवसेनेच्याही डोक्‍यावर हात ठेवेल. 
- सुभाष तळेकर, अध्यक्ष, मुंबई डबेवाला असोसिएशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dabewala demand to shivsena, to form govt. without BJP