दाभोलकर हत्या तपासात सीबीआयचा वेळकाढूपणा

दाभोलकर हत्या तपासात सीबीआयचा वेळकाढूपणा

मुंबई - ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास "सीबीआय'कडून अक्षरशः गुंडाळला जात आहे, ते फक्त "बॅलेस्टिक' अहवालाची सबब सांगून वेळकाढूपणा करताना दिसतात, अशी खरमरीत टीका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने "सीबीआय'वर केली.

दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येत महत्त्वपूर्ण ठरणारा काडतुसांशी संबंधित अहवाल ब्रिटनमधील न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून मागवला आहे, हे कित्येक महिन्यांपासून सांगत "सीबीआय'ने तपासात काहीही प्रगती केलेली नाही, अशी नाराजी न्या. एस. एस. धर्माधिकारी व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने व्यक्त केली. या दोन्ही हत्या समाजमनावर परिणाम करणाऱ्या आहेत. तपास यंत्रणा यात चालढकल करत असेल, तर त्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर आणि खटल्यावर परिणाम होऊ शकतो, तरीही सीबीआय विशेष तपास करत नाही, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.

"आम्ही "बॅलेस्टिक' अहवालाच्या प्रतीक्षेत आहोत, त्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी,' असे कारण अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी खंडपीठाला दिले. तुम्ही सतत वेळ मागता, याचा फायदा आरोपींना होऊन खटल्यामधील गांभीर्य नष्ट होत आहे, हे तुम्हाला कळते का, असा सवाल खंडपीठाने केला. ब्रिटनमधील प्रयोगशाळेऐवजी तुम्ही दिल्लीतील किंवा अन्य स्थानिक प्रयोगशाळेकडूनही अहवाल मागू शकला असता. मात्र, ते तुम्हाला करायचे नव्हते. तुम्हाला वेळ काढायचा आहे, असेही खंडपीठ म्हणाले.

यापुढे अहवाल मागवण्यासाठी सहा आठवड्यांचा अंतिम अवधी न्यायालयाने मंजूर केला. पानसरे हत्या खटल्यात आरोपी वीरेंद्र तावडे आणि समीर गायकवाडवर पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, असे राज्य सरकारच्या विशेष तपास पथकाच्या वतीने ऍड. अशोक मुंदरगी यांनी न्यायालयात सांगितले. आरोपी एकच असल्यामुळे दोन्ही प्रकरणांत दोन्ही तपास यंत्रणांनी समन्वय दाखवावा, असे खंडपीठाने निर्देश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com