‘सायकल कट्ट्या’वर उलगडली सायकलची कथा

‘सायकल कट्ट्या’वर उलगडली सायकलची कथा

दादर - ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्टार्टअप’चे वारे देशात वेगाने वाहत आहेत. ‘स्टार्टअप’ उपक्रमांतर्गत परदेशातील अनेक बड्या कंपन्या अत्याधुनिक व वेगळ्या प्रकारच्या सायकल घेऊन बाजारात दाखल होत असताना भारतातील अनेक मंडळीसुद्धा सायकलवर नानाविध प्रयोग करत आहेत. नेमके हे प्रयोग काय आहेत, निर्मितीमागचे विज्ञान, आर्थिक गणित, पर्यावरण संवर्धनाला त्याचा कशाप्रकारे हातभार लागणार आणि नेहमीच्या वापरातील सायकलपेक्षा वेगळ्या सायकल बनवण्याच्या प्रयोगामागची कहाणी ‘सायकल कट्टा’वर रविवारी (ता. ४) उलगडण्यात आली.

बांबूपासून तयार तयार केलेली, अपंगांसाठीची, बॅटरीवर आणि सौरऊर्जेवर चालणारी, टॅन्डम सायकल, दुमडणारी सायकल, भारतीय बनावटीचे सायकलचे भाग आणि संपूर्ण सायकलच्या निर्मितीमागच्या कथा पहिल्यांदाच त्यांच्या निर्मात्यांच्या तोंडून रविवारी रूपारेल महाविद्यालयाच्या प्रांगणात मुंबईतील नागरिकांना ऐकायला मिळाल्या. विशेष म्हणजे गप्पांच्या पलीकडे जाऊन त्या सायकली प्रत्यक्ष पाहतादेखील आल्या. यातील काही प्रयत्न हे प्रयोगशील तत्त्वावर; तर काही व्यावसायिक स्पर्धेत उतरण्याच्या दृष्टीने करण्यात आले. त्यामुळे ‘सायकल कट्टा’च्या व्यासपीठावर या सर्वांना एकत्रितपणे ऐकणे ही सायकलप्रेमींसाठी पर्वणीच ठरली.

‘सायकल कट्टा’ रविवारी माटुंगा रोड येथील डी. जी. रूपारेल महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. हा सायकल कट्टा सर्वांसाठी खुला होता. या कट्ट्याच्या निमित्ताने अनेकांनी सायकलशी आपला आलेला संबंध आणि अनुभव उपस्थितांना सांगितले. पत्रकार अलका धुपकर आणि प्रशांत ननावरे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी हा सायकल कट्टा भरवला होता. वाहनांच्या वाढत्या वापरामुळे धुराने होणारे प्रदूषण तसेच पर्यावरणपूरक वातावरणनिर्मिती भविष्यासाठी किती आवश्‍यक आहे, यावर रूपारेलचे प्राचार्य तसेच प्राध्यापक यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

दर तीन महिन्यांतून कट्टा
मुंबई आणि पुण्यातील आठ सायकलप्रेमींनी दोन वर्षांपूर्वी सायकल कट्ट्याची स्थापना केली. सध्या सायकल कट्ट्याच्या सदस्यांची संख्या १५ आहे. जनजागृतीसाठी हे सायकलप्रेमी तीन महिन्यांतून एकदा वेगवेगळ्या ठिकाणी हा सायकल कट्टा भरवतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com