मैदान वाचवण्यासाठी दादरवासीयांची मानवी साखळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

मुंबई : मेट्रो 3 मार्गाच्या कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो प्रकल्पाला लागलेले विरोधाचे ग्रहण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. स्थानिकांना विश्‍वासात न घेता सिद्धिविनायक मंदिराजवळील नर्दुल्ला टॅंक मैदान व साने गुरुजी उद्यान एमएमआरसीने ताब्यात घेतले आहे. परिणामी आबालवृद्धांसह मुलांसाठी ते काही वर्षे बंद राहणार असल्याने गिरगावपाठोपाठ दादरमधील रहिवाशांनी रविवारी (ता. 11) सकाळी मानवी साळखी करून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा (एमएमआरसी) विरोध केला.

दादर, प्रभादेवी, धनमिल नाका, एल्फिन्स्टन रोड, फितवाला रोड आदी भागातील मुले क्रिकेट, खो-खो आणि कबड्डीसारख्या मैदानी खेळांसाठी नर्दुल्ला टॅंक मैदानावर येतात. ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग वॉकसाठी आणि सिद्धिविनायक न्यासाकडून अंगारकीच्या दिवशी भक्‍तांसाठी मैदानाचा वापर करण्यात येतो; मात्र काही दिवसांपासून एमएमआरसीने नर्दुल्ला मैदान आणि साने गुरुजी उद्यान मेट्रो 3 च्या कामासाठी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे रहिवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. मैदान आणि उद्यान पुढील पाच वर्षे स्थानिकांसाठी बंद राहणार असल्याने नागरिकांकडून कामाला विरोध होऊ लागला आहे.

शिवसेनेचाही पाठिंबा
मैदान वाचवण्यासाठी रहिवाशांनी एकत्र येत नर्दुल्ला टॅंक मैदान बचाव समिती स्थापन केली आहे. समितीच्या नेतृत्वाखाली रविवारी रहिवाशांनी मानवी साखळी करून मैदान बचावाची हाक दिली. रहिवाशांना मैदान वापरासाठी खुले करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. मानवी साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि तरुण सहभागी झाले होते. आंदोलनाला शिवसेनेनेही पाठिंबा दिला असल्याने भविष्यात ते आणखी तीव्र होण्याची शक्‍यता आहे.

98 झाडांवर कुऱ्हाड
मेट्रो स्थानकाच्या कामासाठी नर्दुल्ला टॅंक मैदान व साने गुरुजी उद्यानातील 98 झाडे तोडण्यात येणार आहेत. त्यातील 32 झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे; मात्र अशी झाडे जगण्याची शक्‍यता खूप कमी असते. परिणामी रहिवाशांनी वृक्ष तोडण्यास विरोध केला आहे.

Web Title: dadar residents fight for ground