डहाणू-नाशिक ट्रेनची पालघरला गरज - उद्धव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

विक्रमगड - पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विक्रमगडमध्ये प्रचाराची तोफ डागली. या वेळी नेहमीप्रमाणे त्यांनी भाजपवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मुद्दा उचलून धरत या ट्रेनची गरजच काय, असा सवाल उपस्थितांना केला. आम्हाला गुजरातला काय जिलेबी-फाफडा खायला जायचे आहे का, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. पालघरच्या जनतेला येथून नाशिकला जाण्यासाठी ट्रेन हवी आहे, त्याचा पत्ता नाही; मात्र मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प गरज नसताना लादला जात असल्याचे ते म्हणाले.

वनगा कुटुंबीयांबाबत केल्या जाणाऱ्या आरोपांबाबत उत्तर देताना ठाकरे म्हणाले, ""ज्या वनगा कुटुंबीयांनी आयुष्य भाजपसाठी दिले त्यांना वाऱ्यावर सोडले नसते तर मी आज युतीच्या प्रचारासाठी इथे आलो असतो आणि मोठ्या फरकाने त्यांना निवडून आणले असते. शिवसेनेवर कुणी बिनबुडाचे आरोप करू नयेत. वनगा कुटुंबीयांना न्याय देण्यासाठीच शिवसेना निवडणूक लढत आहे.'' या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार राजन विचारे, आमदार शांताराम मोरे आदी उपस्थित होते.

Web Title: dahanu-nashik train palghar uddhav thackeray