पांडवकडा परिसर ठरताेय जीवघेणा

सकाळ वृत्‍तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

पाच वर्षांत १८ तरुणांचा मृत्यू; वन विभागाचे दुर्लक्ष

मुंबई : खारघरमधील पांडवकडा परिसरात पावसाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा अतिउत्साहीपणा जीवघेणा ठरत आहे. गेल्या पाच वर्षांत या परिसरात १८ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामधील बहुतांश तरुण १६ ते २० वर्षांतील आहेत.  

पावसाळ्यात उंच कड्यावरून धबधब्याची फेसाळलेली शुभ्र आणि थंड पाण्याची धार अंगावर घेत मस्तीत आनंद घेणाऱ्या पर्यटकांना मोहित करणाऱ्या खारघरमधील धबधब्याचे नाव सर्वत्र झाले आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, रायगड एवढेच काय, तर पुणे परिसरातील पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात. पर्यटकांना धबधब्याचा आनंद मिळावा, यासाठी धबधब्याच्या प्रवाहात दोन बंधारे, प्रसाधनगृहे, संरक्षण भिंत उभारली. स्थानिकांना रोजगार मिळावा, म्हणून वन विभागाने वन व्यवस्थापन समितीची स्थापना करून तिकीट आकारणी सुरू केली; मात्र पांडवकडा येथे पाण्याच्या प्रवाहात बुडून तरुणाचा बळी गेल्याने वन विभागाने पोलिसांची मदत घेऊन पांडवकडा धबधब्यावर बंदी घातली. 

गेल्या पाच वर्षांत या परिसरात १८ तरुणांचा बळी गेला आहे. २०१५ सिद्धेश भालचंद्र चव्हाण (१७),  प्रकाशकुमार झा (२०),  उमेश रणदिवे, दिनेश पाटील (२१), अभिषेक कुमारसिंग (३०), २०१६ मध्ये राम किशोर जैस्वाल (१७), कमलदीप मनीष पांडे (१५), २०१७ मध्ये शंकर तांबाराम पटेल (१८), चिदानंद देविदास बासुरकर (२९), २०१८ फैजान सिद्धिकी (१८), रेहान कमर सिद्धिकी (१८), अबीद सिद्धिकी (३५), महमद असलम शेख (१९) याशिवाय दहा आणि अकरा वर्षांची दोन बालके; तर २०१९ मध्ये शनिवारी चार तरुणींचा बळी गेला. या अठरा तरुणांपैकी असलम शेख वगळता इतर तरुणांचा तलाव, ओढा आणि खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dangerous tourist place pandvkada