'डी' टोळीतील दानिश अली पोलिसांच्या ताब्यात

Crime
Crime

मुंबई - कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम याच्या टोळीतील शस्त्र तस्कर दानिश अली याचा ताबा अमेरिकन यंत्रणांकडून मिळवण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. सध्या गुन्हे शाखेच्या पोलिस कोठडीत ठेवलेल्या दानिशच्या जीवाला धोका असल्याने या अटकेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. अमेरिकेने ‘नार्को टेररिझम’ प्रकरणात दाऊदचा भाचा सोहेल कासकर आणि दानिश अली यांच्यासह दोन पाकिस्तानी नागरिकांना २०१४ मध्ये अटक केली होती.

अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेकडे ठोस पुरावा नसल्यामुळे या दोघांना पकण्यासाठी व्यूहरचना आखली होती. अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी त्यांचे एक पथक कोलंबिया राज्य सरकारच्या विरोधात असल्याचे भासवून सोहेल आणि दानिश यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर शस्त्रखरेदी आणि देवाणघेवाणीची बोलणी केली. अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा या दोघांच्या नकळत सर्व तपशिलाचे व्हिडीओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग करत होती. या दोघांकडून पुरेशी माहिती आणि पुरावे हस्तगत केल्यानंतर अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेने सोहेल आणि दानिश यांच्यासह हमीद ख्रिस्ती ऊर्फ बेनी आणि वाहब ख्रिस्ती ऊर्फ एंजल यांना स्पेनमधून २०१४ मध्ये अटक केली. 

हे चौघेही दीड वर्षे तुरुंगात होते. गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर त्यांचा ताबा एफबीआयला (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) देण्यात आला. त्यांच्या पोलिस कोठडीत १२ सप्टेंबर २०१५ रोजी अडीच वर्षांची वाढ करण्यात आली. दरम्यान, हमीद ख्रिस्ती ऊर्फ बेनी आणि वाहब ख्रिस्ती ऊर्फ एंजल यांचा ताबा मिळवण्यासाठी पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी प्रयत्न सुरू केले. या दोघांचा ताबा मिळवण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणेने प्रयत्न सुरू केल्यानंतर ऑक्‍टोबर २०१८ मध्ये अमेरिकी सुरक्षा यंत्रणेने दानिशचा ताबा भारताला देण्याची परवानगी दिली. त्यानुसार १५ नोव्हेंबर २०१८ रोजी भारतीय सुरक्षा यंत्रणेला दानिशचा ताबा मिळाला.

रशियातून हिरे तस्करी
दिल्लीतील जामा मशीद परिसरात राहणाऱ्या दानिशची कौटुंबिक परिस्थिती बेताची होती. त्याचे वडील जामा मशिदीत काम करायचे. वाढते वय आणि आजारपणामुळे त्यांनी नोकरी सोडून दिली. दानिशचा मोठा भाऊ रशियात डॉक्‍टर असून, दुसरा भाऊ सर्वोच्च न्यायालयात वकिली करतो. दानिश २००१ मध्ये नोकरीच्या शोधात दुबईला गेला होता. त्या ठिकाणी त्याची ओळख सोहेल कासकरसोबत झाली.   दरम्यान, रशियात हिरे खरेदी-विक्री व्यवसाय केल्यास चांगली कमाई होईल हे सोहेलच्या लक्षात आले. त्यामुळे सोहेलने २००३ आणि २००४ मध्ये विद्यार्थी व्हिसावर दानिशला रशियात पाठवले. तो शिक्षण घेतानाच रशियातील व्यापाऱ्यांची माहिती सोहेलला देत होता. छुप्या पद्धतीने त्याने व्यवसायही सुरू केला होता. याच काळात दक्षिण आफ्रिकेत हिरे तस्करी करताना सोहेलला पहिल्यांदा अटक झाली. त्यातून त्याने सुटका करून घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या सुरक्षा यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा फायदा घेऊन शस्त्र तस्करी सुरू केल्यानंतर ते अमेरिकेच्या रडारवर आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com