
दिवाळीच्या पूर्वसंध्येला डोंबिवलीकर घरात करणार अंधार
डोंबिवली - दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून संपूर्ण देशात साजरा होतो. दिवाळी हा सण कार्तिकी अमावस्येला येतो, अमावस्येला सर्वत्र अंधार असल्याने घरोघरी, घराबाहेर दिवे लावून अंधारावर विजय मिळविला जातो. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे डोंबिवलीची झालेल्या बकाल अवस्थेसाठी डोंबिवलीच्या पूर्वसंध्येला डोंबिवलीकरांनी घरात अंधार करुन बसायचा निर्णय घेतला आहे. तसेच शंखनाद, थाळी, घंटा नाद करुन राजकारण विरहित आंदोलन करीत प्रशासनाचे नागरिकांच्या समस्येकडे डोंबिवलीकर लक्ष वेधणार आहेत. आंदोलन मे शक्ती है असे म्हणत शहराच्या बकाल अवस्थेवरुन आता नागरिकांनीच पावले उचलण्यास सुरुवात केली असून आता तरी प्रशासनाला जाग येते का हे पहावे लागेल.
कल्याण डोंबिवली शहरातील नागरिकांना घरातून बाहेर पाय टाकला नाही तोच अनेक समस्यांचा दररोज सामना करावा लागत आहे. यामध्ये वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरावस्था, पाणी टंचाई, सार्वजनिक वाहतूकीची साधणे नाहीत, रिक्षा चालकांची मनमानी यांसारख्या अनेक समस्या भेडसावतात. राजकीय पक्ष नागरिकांच्या समस्यांविषयी एक दिवसीय आंदोलन करुन केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेतात, समस्या मात्र जैसे थेच आहेत. गेल्या दोन वर्षापासून कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात प्रशासकीय राजवट सुरु असून प्रशासनाच्या हाती कारभार गेल्याने आता तरी काही चांगले चित्र शहरात पहायला मिळेल अशी आशा नागरिकांना होती. मात्र त्यावरही पाणी फेरले असून प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील सामान्य जनतेच्या हाल अपेष्टांचे काही पडलेले नाही असेच येथील परिस्थितीवरुन दिसून येते.
अखेर डोंबिवलीकरांनी आता स्वतःच याविषयी आवाज उठविण्याचे ठरविले आहे. त्यासाठी राजकारण विरहीत आंदोलन स्थानिक नागरिकांकडून छेडले गेले आहे. लोकांनी लोकांसाठी केलेले हे आंदोलन असून याची सुरुवात आत्ता पासून करुया असे म्हणत डोंबिवलीतील रस्त्यांच्या भयानक अवस्थेकडे ढिम्म आणि बेजबाबदार केडीएमसी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनआंदोलन छेडण्यात आले आहे. येत्या गुरुवारी 20 ऑक्टोबरला दिवाळीच्या पूर्वसंध्येला रात्री 8 वाजता घरातील दिवे बंद करण्याचा निर्णय डोंबिवलीकरांनी घेतला आहे. यामध्ये शहरातील अनेक सोसायट्यांनी सहभाग घेतला आहे. घरातील दिवे बंद करुन घरातून किंवा रस्त्यावर उतरुन एकत्रित थाळी, घंटा नाद केले जाणार आहे. त्याविषयीचे संदेश जागरुक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात आहेत. या आंदोलनाने काय होणार ? असा सवाल अनेक नागरिकांच्या मनात येणे साहाजिक आहे, त्यामुळे त्यांनी आपापल्या पद्धतीने आंदोलनाचे पर्याय निवडावे. परंतू त्या दिवशी त्या वेळेत कोणत्याही प्रकारे आपला असंतोष एकत्रित व्यक्त करावा असा सल्लाही दिला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रव्यवहार...
डोंबिवली अनेक समस्यांचं माहेरघर, या शहराला कोणीही वाली उरला नाही, प्रशासन असो वा निवडून दिलेले राजकीय नेते असो, या शहराची येथील नागरिकांची कायम फसवणूक झाली आहे. येथील नागरिक म्हणजे सहनशीलतेची परिसीमा ओलांडलेला जीव आहे, त्यामुळे कोणी आवाज उठवित नाही. हेच प्रशासन आणि राजकीय पुढाऱ्यांनी हेरले आहे. परंतू आता आवाज उठविण्याची वेळ आली आहे असे म्हणत एमआयडीसीतील नागिरकांनी व डोंबिवलीतील दक्ष नागरिक मंचच्या वतीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. कल्याण डोंबिवलीतील समस्यांविषयी थेट पंतप्रधानांना पत्र किंवा ई मेलने कळविले जात आहे. शंभरहून अधिक पत्रव्यवहार आत्तापर्यंत ई मेल द्वारे करण्यात आले आहेत. नागरिकांना रोड, विजेचा लपंडाव, स्वच्छतेचा अभाव, नाले- गटारं कायम तुंबलेली, घाण, कारखान्यांचं प्रदूषण, पब्लिक ट्रांस्पोर्टचा खेळ, वाहतुकीच्या समस्या अगदी नवी मुंबई किंवा ठाणेकडे जाण्यासाठी अनेक तासांचा कंटाळवाणा-थकवणारा प्रवास, पाणी इत्यादी अनेक समस्यांचे माहेरघर म्हणजे डोंबिवली. तेव्हा आपल्या समस्यांचे साकडे थेट पंतप्रधानांना कळविण्या खेरीज मार्ग उरला नाही. त्यामुळे पत्र किंवा ई-मेल द्वारे समस्यां पंतप्रधानांना पाठवले जात आहेत. त्यासाठी पत्राचा विषय, पत्ता, ईमेल आयडी नागरिकांना देण्यात आला आहे. समस्या सोडविण्यासाठी एक शाश्वत प्रयत्न आम्ही सुरु केला असून त्यातून तरी मार्ग निघावा अशी अपेक्षा असल्याचे दक्ष नागरिक मंचच्या एका सदस्याने सांगितले.