दाऊद इब्राहिमचा हस्तक तारिक परवीन याला अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

ठाणे - कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा हस्तक आणि छोटा शकील याचा उजवा हात म्हणून ओळख असलेल्या तारिक अब्दुल करीम परवीन (51) याला गुरुवारी मध्यरात्री ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने ताब्यात घेऊन मुंब्रा पोलिसांच्या स्वाधीन केले. मुंब्य्रात 20 वर्षांपूर्वी घडलेल्या दुहेरी खून प्रकरणामध्ये तारिक हा फरारी होता. काही महिन्यांपूर्वीच दाउदचा भाऊ इक्‍बाल कासकर याला ठाणे पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे दाऊदच्या साम्राज्याला मोठा हादरा मानला जात आहे.

मुंब्रा येथील किस्मत कॉलनी परिसरातील अब्दुला पटेल शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ 31 ऑगस्ट 1998 ला मोहमद इब्राहिम बांगडीवाला आणि त्याचा मित्र परवेज अन्सारी या दोघांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. या गोळीबारात रोशनआरा खान नावाची मुलगीही जखमी झाली होती. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या खूनप्रकरणी सहा संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली होती; मात्र त्यांची न्यायालयामध्ये पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली होती. या गुन्ह्यामध्ये तारिक परवीन हा फरारी होता. काही वर्षांपासून तारिक परवीन हा मुंबईत राहत असून, त्याने येथील एल. टी. मार्गाजवळील अशोका शॉपिंग सेंटरमध्ये रियल इस्टेटचे कार्यालय थाटले होते. याबाबत माहिती मिळताच ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलिस निरीक्षक विकास घोडके आणि त्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री त्याला मुंबईतून ताब्यात घेतले.

Web Title: dawood ibrahim supporter tariq parveen