उल्हासनगरच्या स्थापनादिनी आयुक्तांना डांबर भेट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

उल्हासनगर पालिकेने शहरातील काही प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण केले. मात्र पावसाळ्यापूर्वीच डांबरी रस्ते खराब झाले असून पावसाळ्यात तर उरले सुरले डांबरही गायब झाल्याने सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पालिका हा प्रकार गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप करत मनसने डांबरी रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्यासाठी आयुक्त सुधाकर देशमुख यांना चक्क डांबर भेट दिले.

उल्हासनगर : उल्हासनगर पालिकेने शहरातील काही प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण केले. मात्र पावसाळ्यापूर्वीच डांबरी रस्ते खराब झाले असून पावसाळ्यात तर उरले सुरले डांबरही गायब झाल्याने सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पालिका हा प्रकार गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप करत मनसने डांबरी रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्यासाठी आयुक्त सुधाकर देशमुख यांना चक्क डांबर भेट दिले. विशेष म्हणजे देशमुख हे उल्हासनगर स्थापना दिनाचा सोहळा पार पाडून पालिकेत येत असतानाच मनसेने त्यांना डांबर भेट दिली. 

उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. पालिकेमार्फत खडी आणि ग्रिडने खड्डे भरण्यासाठी तब्बल 50 लाखांचे काम देण्यात आले आहे. तसेच पॉलिमर बेस खड्डे भरण्यासाठी 30 लाख रुपयांचे वेगळे काम देण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही गरज असलेल्या जागी वेगाने खड्डे भरण्याचे काम सुरू झालेले नाही.

या प्रकाराने संतप्त झालेले मनसेचे पदाधिकारी प्रदीप गोडसे, बंडू देशमुख, मनोज शेलार, प्रमोद पालकर, सागर चव्हाण, मैन्नुद्दीन शेख, शाळीग्राम सोनावणे सचिन बेंडके, योगीराज देशमुख यांनी उल्हासनगरच्या स्थापना दिवसाचा सोहळा सुरू असलेले विराट अंबे स्पोर्टस क्‍लब गाठले आणि आयुक्त सुधाकर देशमुख बाहेर पडताच त्यांना खड्डे बुजवण्यासाठी डांबराचे पाकिट भेट दिले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the day of establishment of Ulhasnagar Dambar gifted to commissioner