डीजेच्या जमान्यात ढोलकी व्यवसायाला उतरती कळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

श्रावण महिना सुरू झाला असून आता लवकरच बाप्पाचे आगमन होणार आहे. श्रावणात मंगळागौर आणि गणेशोत्सवात पारंपरिक गाणी गाण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रात असून कोकणात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही गाणी गायनाला ढोलकीची साथ ही लागतेच. मात्र, याच ढोलकी व्यवसायाला आज उतरती कळा लागली आहे. शहरी भागात या ढोलकीला ग्राहक मिळत नसल्याने, या व्यवसायाला घरघर लागली आहे.

नवी मुंबई ः श्रावण महिना सुरू झाला असून आता लवकरच बाप्पाचे आगमन होणार आहे. श्रावणात मंगळागौर आणि गणेशोत्सवात पारंपरिक गाणी गाण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रात असून कोकणात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही गाणी गायनाला ढोलकीची साथ ही लागतेच. मात्र, याच ढोलकी व्यवसायाला आज उतरती कळा लागली आहे. शहरी भागात या ढोलकीला ग्राहक मिळत नसल्याने, या व्यवसायाला घरघर लागली आहे. सध्या डीजेचा जमाना असल्याने ढोलकीचा नाद मात्र अनेक जण विसरून गेले आहेत. एक काळ असा होता, की ढोलकीच्या तालाशिवाय कोणत्याच कार्यक्रमाची सुरुवात होत नसे; मात्र आता ढोलकीचा आवाज फक्त भजनातच मर्यादित राहिला आहे.

महाराष्ट्रात कुठलाही सण म्हटले की त्यात नाचगाणे हे आलेच. शिमगा असो की श्रावणातील मंगळागौर असो किंवा गणेशोत्सव असो, यात जर नाचगाणे नसेल, तर या सणाला मजाच येत नाही. कोकणात आजही मंगळागौर, गणेशोत्सव मोठ्या उत्सवाने रात्रभर घरी गाणी म्हणून साजरा करतात; मात्र या नाचगाण्यांना साथ लागते, ती ढोलकीची आणि आजही श्रावण महिन्यात ढोलकी विक्रेते ढोलकी विकत असताना दारोदार दिसत आहेत; मात्र वाढत्या धावपळीच्या जीवनशैलीत डीजे आणि घरगुती इलेक्‍ट्रिक टेपने आपली जागा व्यापल्याने शहरी भागात असली नाचगाणी हवीशी वाटत नाही. 

या ढोलकी विक्रेत्यांना ग्राहक मिळणे मुश्‍किल झाले असून, त्यांच्या व्यवसायाला घरघर लागली आहे. २०० रुपयांपासून ते ७०० रुपयांपर्यंत ढोलकीचे दर आहेत; मात्र ग्राहक नसल्याने यातील बरेच व्यावसायिक आपला वडिलोपार्जित व्यवसाय असल्याने तो सांभाळून आहेत; मात्र नवीन व्यावसायिक या व्यवसायात उतरायचे नाव घेत नाही.
 
कोकण परिसरात या ढोलकीला तुरळक मागणी असली, तरी नवी मुंबईसारख्या शहरातही ढोलकीला खप नसल्याचे व्यावसायिक सांगतात. त्यामुळे आज जे काही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत व्यावसायिक आहेत, तेही आपला व्यवसाय बंद करण्याच्या मार्गावर आहेत.

शहरी भागात इलेक्‍ट्रॉनिक जमाना आल्याने पारंपरिक गाणी गाण्याची पद्धत नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कोकणातील ग्रामीण भागात आजही ही कला जोपासली जात आहे. ढोलकीविक्रीचा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे; मात्र शहरी भागात या ढोलकीला कोणी ग्राहक मिळत नसल्याने आम्हाला आमचा व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे.
- रफिक पटेल, ढोलकी विक्रेता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the days of DJs, drumming has come down