नवापूर किनाऱ्यावर मृत मासे

मनोज पंडित
मंगळवार, 10 एप्रिल 2018

बोईसर - कारखान्यांद्वारे सोडल्या जाणाऱ्या रसायन मिश्रित पाण्यामुळे बोईसर येथील नवापूर खाडीची जैवविविधता धोक्‍यात येत आहे. सोमवारी सकाळी हजारो मृत मासे किनाऱ्यावर आढळले असून ग्रामस्थांनी त्याविरोधात संताप व्यक्त केला आहे. ग्रामस्थांनी थेट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय गाठून हे मासे कार्यालयात नेऊन फेकले. 

बोईसर - कारखान्यांद्वारे सोडल्या जाणाऱ्या रसायन मिश्रित पाण्यामुळे बोईसर येथील नवापूर खाडीची जैवविविधता धोक्‍यात येत आहे. सोमवारी सकाळी हजारो मृत मासे किनाऱ्यावर आढळले असून ग्रामस्थांनी त्याविरोधात संताप व्यक्त केला आहे. ग्रामस्थांनी थेट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय गाठून हे मासे कार्यालयात नेऊन फेकले. 

बोईसर एमआयडीसीत पंधराशे कारखान्यांपैकी बहुतांश कारखान्यांमध्ये रासायनिक उत्पादन घेतले जाते. इथून निघणारे  सांडपाणी सामुदायिक प्रक्रिया करून नवापूर खाडीत सोडले जाते. प्रक्रिया केंद्राची क्षमता केवळ २५ दशलक्ष लीटर असताना दररोज सुमारे ६० दशलक्ष सांडपाण्याचा निचरा होतो. त्यामुळे प्रक्रिया न करताच सांडपाणी थेट खाडीत सोडले जाते. त्यामुळे मृत मासे किनाऱ्यावर येण्याच्या घटना काही दिवसांपासून घडत आहेत; मात्र सोमवारी अचानक मोठ्या प्रमाणावर मासे किनाऱ्यावर आढळून आल्याने यावर निर्वाह करणाऱ्या कोळी बांधवांचा संताप अनावर झाला. प्रदूषणकारी कारखाने सांडपाणी थेट खाडीत सोडत असल्याने आमचा व्यवसाय धोक्‍यात आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ गांभीर्याने पाहत नसल्याने मृत मासे गोळा करून कार्यालयात टाकले. येथे ५० दक्षलक्ष लीटर सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचे कामही प्रलंबित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. असा प्रकार मार्चमध्येही घडला होता; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. त्यावेळी हे प्रदूषण बंद झाले नाही, तर आमच्या पद्धतीने कार्यवाही करू, असा इशारा दिला होता. सतत होत असलेली चालढकल आणि मृत मासे आढळण्याचा प्रकार यामुळे थेट कार्यालयात मासे टाकून निषेध व्यक्त केला. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयात विचारणा केली असता, त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही. 

ग्रामस्थांनी कायदा हातात घेऊ नये. प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणी लवकर निर्णय घ्यावा. नवे केंद्र उभारणीत होत असलेल्या दिरंगाईचाही तपास करावा. 
डी. के. राऊत, अध्यक्ष, तारापूर इंडस्ट्रीयल मॅनुफॅक्‍चर असोसिएशन.

Web Title: Dead fish on the coast of Navapur