वालधुनी नदीत पुन्हा घातक रसायनयुक्त केमिकल; नागरिक भयभीत

रविंद्र खरात 
रविवार, 2 डिसेंबर 2018

उल्हासनगर : चार वर्षांपूर्वी वालधुनी नदीत उग्र वासाचे घातक रसायनयुक्त केमिकल सोडण्यात आल्याने त्याची शेकडोच्या संख्येने नागरिकांना बाधा झाली होती. तेंव्हा नदी किनारी सिसिटीव्ही कॅमेरे बसवण्याचा ठराव पास करण्यात आला होता. मात्र, तो कागदावरच ठेवण्यात आल्याने पुन्हा केमिकल सोडण्याचा प्रकार होऊ लागला आहे. याप्रकाराने भयभीत झालेले नागरिक सतत पोलीस ठाण्यात धाव घेत आहेत.
 
29 नोव्हेंबर 2014 च्या मध्यरात्री वडोल गावाजवळ वालधुनी नदीच्या पात्रात टँकर माफियांनी उग्र वासाचे घातक रसायनयुक्त केमिकल सोडले होते. त्याची शेकडोच्या संख्येने महिला-पुरुष-वयोवृद्ध-लहान मुले यांना बाधा झाल्याने त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी सर्व पक्षीयांनी एकवटून टँकर माफियांवर कारवाई करण्याची मागणी केल्यावर पोलिसांनी बाहेरच्या शहरातून घातक रसायन आणून वालधुनी नदीत सोडणाऱ्या दोन टँकर चालकांना अटक केली होती. तेंव्हा आयुक्त बालाजी खतगावकर यांनी नदीच्या किनारी 13 सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असे जाहीर केले होते. त्यासाठी सुमारे सव्वा कोटीच्या निधीची तरदूत केली होती. त्यानुसार ठराव पास झाला होता. मात्र तो कागदावरच राहिल्याने पुन्हा घातक रसायन सोडणारे टँकर माफिया सक्रिय झाले आहेत.

या रसायनाच्या वासाचा त्रास नागरिकांना होऊ लागल्याने नगरसेवक टोनी सिरवानी, लाल पंजाबी, गजानन शेळके, वालधुनी जल बिरादरीचे शशिकांत दायमा यांच्या सोबत नागरिक सतत मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेत आहेत. दरम्यान, आज सायंकाळी प्रदूषण नियंत्रण दिवसानिमित्त शिवशंकर शॉपकीपर असोसिएशन, हिराली फाऊंडेशन, वालधुनी जल बिरादरी यांच्या पुढाकाराने वालधुनीची घातक रसायनयुक्त केमिकलपासून सुटका करण्याची हाक देण्यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात आली. याशिवाय 26 जानेवारी 2019ला नदीच्या किनारी धरणे आंदोलन करण्यात येणार असेही जाहीर करण्यात आले आहे.

यासंदर्भात पालिका आयुक्त अच्युत हांगे यांच्याशी संपर्क साधला असता, ''उद्या (सोमवारी) वालधुनी नदीची पाहणी करण्यात येणार आहे. यासोबतच सिसिटीव्ही कॅमेराच्या ठरावाबाबत देखील सकारात्मक निर्णय घेण्यात येणार, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
 
Web Title: Deadly chemical left in river Valduni; Citizens frightened