धावत्या लोकलमध्ये जीवघेणा स्टंट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

रेल्वेच्या हार्बर मार्गावरील चेंबूर ते वडाळा रोडदरम्यान लोकलमध्ये जिवावर बेतणारी स्टंटबाजी

वडाळा : रेल्वेच्या हार्बर मार्गावरील चेंबूर ते वडाळा रोडदरम्यान लोकलमध्ये जिवावर बेतणारी स्टंटबाजी करणाऱ्या दोन तरुणांना गुरुवारी (ता. १) वडाळा लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. मोसीन मोहम्मद आणि नासीर अहमद अशी त्यांची नावे असून त्यांच्यावर आपला व इतर प्रवाशांचा जीव धोक्‍यात घातल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात येणार आल्याची माहिती वडाळा वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी दिली.

प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन वारंवार सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेच्या वतीने प्रवाशांना आवाहन करण्यात येते. रेल्वे पोलिसांच्या वतीने उपक्रम व मोहीमही राबवण्यात येते. तरीही जीवघेणा स्टंट करून त्याचा व्हिडीओ व्हायरल करण्याचे प्रकार कमी झालेले नाहीत.

असाच प्रकार गुरुवारी (ता. १) उघड झाला. चेंबूर ते वडाळा रोडदरम्यान धावणाऱ्या गाडीत दोन स्टंटबाज लोकलमधील खांबावर चढून आणि लटकून स्टंट करीत होते. अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. वारंवार घडणाऱ्या स्टंटबाजीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्याचे आव्हान रेल्वे पोलिसांसमोर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deadly stunt in a running local