प्रिय आई-बाबा, मी तुम्हाला नम्र विनंती करतोय...

दिनेश गोगी
सोमवार, 14 जानेवारी 2019

उल्हासनगर - कर वसूलीसाठी आता उल्हासनगर पालिकेने एक अजब शक्कल लढवली आहे. उल्हासनगरातील विद्यार्थ्यांकरवी त्यांच्या आई बाबांना टॅक्स भरण्याची भावनिक साद घालण्याची युक्ती पालिकेद्वारे लढवण्यात आली आहे. पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आई-बाबांच्या नावाने तयार केलेले विनंती पत्र उद्या (सोमवार) विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून, त्या पत्राद्वारे विद्यार्थी त्यांच्या आई बाबांना टॅक्स भरण्याची साद घालणार आहेत. कर निर्धारक व संकलक अविनाश फासे यांनी ही माहिती दिली.

उल्हासनगर - कर वसूलीसाठी आता उल्हासनगर पालिकेने एक अजब शक्कल लढवली आहे. उल्हासनगरातील विद्यार्थ्यांकरवी त्यांच्या आई बाबांना टॅक्स भरण्याची भावनिक साद घालण्याची युक्ती पालिकेद्वारे लढवण्यात आली आहे. पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आई-बाबांच्या नावाने तयार केलेले विनंती पत्र उद्या (सोमवार) विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून, त्या पत्राद्वारे विद्यार्थी त्यांच्या आई बाबांना टॅक्स भरण्याची साद घालणार आहेत. कर निर्धारक व संकलक अविनाश फासे यांनी ही माहिती दिली.

या वर्षात एकूण 425 कोटी रुपये पालिकेला मालमत्ता कराच्या रूपात वसूल करायचे आहेत. पाच वर्षांपूर्वी जेमतेम 70-75 कोटी रुपयांच्या घरात वसुली होत होती. अभययोजना सुरू केल्यावर हीच वसुली शंभर कोटी रुपयांपर्यंत जात असल्याने उल्हासनगर पालिकेने ही योजना पाचव्यांदा लागू केली आहे.
 यंदा ही वसुली शंभर कोटींच्या वर अर्थात अधिक पटीने व्हावी यासाठी पालिकेने कंबर कसली असून, त्यासाठी 83 नगरसेवकांना त्यांच्या वॉर्डातील थकबाकी वसूल करण्याकरिता सहकार्य करण्याची हाक दिली आहे. त्यात आता विद्यार्थ्यांनी त्यांच्या आई-बाबास टॅक्स भरण्याची साद घालावी यासाठी आयुक्त अच्युत हांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी-हिंदी आणि सिंधी भाषेतून विनंती आग्रह पत्र तयार केले आहे. 

हे पत्र पालिकेच्या 28 शाळांतील विद्यार्थ्यांसह सर्व खाजगी शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आई-बाबांना पाठविण्यासाठी देण्यात येणार असल्याचे अविनाश फासे यांनी सांगितले.

"असा आहे विनंती आग्रह पत्रातील मथळा"
प्रिय आई बाबास,
साष्टांग दंडवत.

आज मी आपणास एक विशेष विनंती पत्र लिहत आहे.
आपणास माहीत आहे काय? महानगरपालिकेने आपल्याला चांगले रस्ते, पुरेसे शुद्धपाणी, आरोग्य, चांगले शिक्षण यासारख्या सुविधा देण्याचा वसा घेतला आहे. विविध योजना राबवल्या जात आहेत. आता आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी 10 ते 31 जानेवारी या कालावधीत अभययोजना जाहीर केली आहे. या योजने अंतर्गत मालमत्ता कराचा संपूर्ण भरणा केल्यास, विलंब शास्ती शंभर टक्के माफ केली जाणार आहे.
आई बाबा, सुविधांसाठी महानगरपालिकेस निधीची गरज आहे. मालमत्ता कर हे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे. नागरिकांकडे थकबाकी बाकी आहे. आपणच जर मालमत्ता कर वेळेत भरला नाही तर सुविधा कशा  मिळतील?आपण तरी मालमत्ता कर भरला आहे काय? अद्याप भरला नसेल तर आजच शहराच्या विकासासाठी रुपये भरा आणि आमचेही भविष्य सुखकर करा. कर भरला नाही तर आपली संपत्ती जप्त होवून त्याचा लिलावही होवू शकतो. त्यामुळे समाजात आपली बदनामी होईल आणि राहायला घरही राहणार नाही. तरी आपण मालमत्ता कर भरुया, शहरविकासासाला हातभार लावून निश्चितपणे राहूया.

आपला/आपली नम्र
लाडका/लाडकी

या प्रत्राचा फायदा कर वसूलीसाठी होणार आणि याला हमखास प्रतिसाद मिळणार असा विश्वास कर निर्धारक व संकलक विनायक फासे यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dear my parents, I'm kindly requesting you