वाडा-मनोर महामार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

वाडा-मनोर या महामार्गावर शनिवारी रात्री साडेनऊ च्या सुमारास मोटर सायकल स्वार आणि पिकअप टेम्पो यांच्या मधे भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन जणांचा मृत्यु झाला आहे.

वाडा - तालुक्यातील वाडा-मनोर या महामार्गावर केळीचा पाडा आणि पोशेरी यांच्या दरम्यान शनिवारी रात्री साडेनऊ च्या सुमारास मोटर सायकल स्वार आणि पिकअप टेम्पो यांच्या मधे भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन जणांचा मृत्यु झाला आहे. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वीच विक्रांत चौधरी या तरुणाचे दुर्दैवी अपघाती निधन झाले होते. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मिळालेल्या माहितीवरून, होंडा कंपनीच्या शाईन ह्या मोटरसाईकल वरून (क्रमांक एम.एच.04 एफ.एक्स.8799) वरून अक्षय गणेश गवा (वय21) राहणार चनेमान व सचिन रमेश निसकटे (वय20) राहणार पोशेरी  हे वाड्याकडे येत असताना केळीचा पाडा या ठिकाणी एका वाहनाला ओव्हरटेक करत असताना मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अक्षय गवा याचा जागीच मृत्यू झाला आहे तर सचिन निसकटे हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर वाडा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारसाठी ठाणे येथे नेण्यात येत असताना त्याचाही रस्त्यातच मृत्यू झाला.
       
सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने भिवंडी-वाडा-मनोर या महामार्गाचे रुंदीकरणाचे काम घेतले आहे. मात्र 5 वर्ष पूर्ण होऊनसुद्धा या महमर्गावर अनेक ठिकाणी कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. अशा अपूर्ण आणि अरुंद राहिलेल्या रस्त्यांवर वारंवार आपघात घडत असून आत्तापर्यंत अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. मात्र असे असूनही सुप्रीम कंपनीने ह्या अपूर्ण कामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून सर्वसामान्य नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

Web Title: Death of both of them in an accident on the Wada Manor highway