चोरट्याला पकडताना रेल्वेतून पडल्याने मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

रे रोड रेल्वेस्थानकावर मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला पकडताना रेल्वेतून खाली पडून 20 वर्षीय बिलाल आलम या तरुणाचा मृत्यू झाला.

मुंबई : रे रोड रेल्वेस्थानकावर मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला पकडताना रेल्वेतून खाली पडून 20 वर्षीय बिलाल आलम या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांनी चोरट्याला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आलम अकबर अली शेख (26) असे अटक आरोपीचे नाव आहे. 20 हजार रुपयांच्या मोबाईल चोरीमुळे आलमला प्राणाला मुकावे लागल्याने कोपरखैरणे परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आयेशा साजीद खान (14) कोपरखैराणेतील रहिवासी आहे. मृत बिलाल आलम आयेशाचा शेजारी आहे. आलम हा 9 नोव्हेंबर रोजी हाजीअलीला जात होता. आएशा व तिची बहीण सिद्री (8) त्याच्यासोबत हाजीअलीला जाण्यासाठी निघाली होती. त्यांनी दुपारी अडीचच्या सुमारास वाशी येथून सीएसटी लोकल पकडली. त्या वेळी बिलाल खिडकीच्या शेजारी बसला होता. आएशाने बिलालकडून मोबाईल घेत ती मोबाईलवर गाणी ऐकत होती.

लोकल रे रोड येथे पोहोचली असता आरोपी शेखने आएशाच्या हातातील मोबाईल हिसकावला. त्या वेळी आलमने हा प्रकार पाहिला व त्याने शेखच्या दिशेने झेप घेऊन पकडले. त्या वेळी शेखने दरवाजाच्या दिशेने उडी घेत पळण्याचा प्रयत्न केला; मात्र यात तोल गेल्याने आलम दरवाजाच्या बाहेर फेकला गेला. आलमला जे.जे. रुग्णालयात तत्काळ नेण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

लोकलमधून पडल्यानंतर फलाटाशेजारच्या भिंतीवर आपटून तो लोकलखाली आला. याप्रकरणी सुरुवातीला अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासानंतर याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही तपासणी व स्थानिक खबऱ्यांमार्फत केलेल्या तपासात या प्रकरणात माहुलमध्ये राहणाऱ्या शेखचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला मुंब्रा येथून अटक केली. 

web title : Death by falling from train while catching thief


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death by falling from train while catching thief