न घेतलेल्या कर्जाचा अपंग शेतकऱ्यावर बोजा

Farmer
Farmer

मुंबई - कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत असताना सोलापूर जिल्ह्यातील जातेगावातील एका अपंग शेतकऱ्याने कर्जासाठी अर्ज केला म्हणून त्याच्या सातबारावर एक लाखाचा बोजा वाढला आहे. दोन वर्षांपासून सातबारावर अपंग वित्त व विकास महामंडळाकडून घेतलेल्या कर्जाची नोंद असल्याने कांतीलाल शिंदे यांना अन्य ठिकाणाहून कर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे.

कांतीलाल शिंदे हे डोळ्याने अधू असून, त्यांनी २०१७ मध्ये अपंग विकास महामंडळाकडे कर्जासाठी अर्ज केला होता. शिंदे यांना एक लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. त्याची प्रथामिक प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली होती.

अर्ज करतानाच शिंदे यांनी त्यांच्या शेतीचा सातबारा महामंडळाला सुपूर्त केला होता. मात्र पूर्वीच्या कर्जाची वसुलीच झालेली नसल्याने केंद्रीय महामंडळाने नव्या कर्जाच्या वितरणावर स्थगिती आणली. त्यामुळे शिंदे यांना कर्ज मिळू शकले नाही. परंतु सातबारा सादर केल्याने त्यावर कर्जाची नोंद झाली आहे. कर्ज वितरणावरील स्थगिती उठण्याची शक्‍यता असून, लाभार्थ्यांना कर्जाचे वाटप करण्यात येईल. मात्र शिंदे यांच्या सातबारावर २०१७ पासून कर्ज घेतल्याची नोंद असल्याने तेव्हापासूनचे व्याज दंड वसूल केला जाण्याची शक्‍यता आहे.

अपंग महामंडळाने ११० कोटी रुपयांचे कर्ज वाटले आहे. त्यात सुमारे ५५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे अद्याप महामंडळाने लाभार्थ्यांना कर्ज वाटप केले नाही. कर्जवसुलीसाठी केंद्रीय महामंडळाने समिती नियुक्त केली आहे. कर्जासाठी अर्ज केल्यावर स्थावर मालमत्तेचे कागदपत्र सादर करावे लागतात. त्यामुळे सातबारावर ही नोंद झाली आहे. 
- सुनील साळवी, महाव्यवस्थापक, अपंग महामंडळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com