"जीपीएस'मुळे लेटलतीफ तावडीत; पालिकेचा वेतन कपातीचा निर्णय 

सुजित गायकवाड
गुरुवार, 25 एप्रिल 2019

कर्मचारी, अधिकाऱ्यांना वेळेची शिस्त आणि कर्तव्याची जाणीव निर्माण व्हावी याकरिता पालिकेने त्यांना "जीपीएस'ची मनगटी घड्याळे दिली आहेत. त्याची उपयुक्तता काही दिवसांतच स्पष्ट होऊ लागली आहे.

नवी मुंबई -  कर्मचारी, अधिकाऱ्यांना वेळेची शिस्त आणि कर्तव्याची जाणीव निर्माण व्हावी याकरिता पालिकेने त्यांना "जीपीएस'ची मनगटी घड्याळे दिली आहेत. त्याची उपयुक्तता काही दिवसांतच स्पष्ट होऊ लागली आहे. पहिल्या टप्प्यात अशी घड्याळे बांधणारे 28 टक्के कर्मचारी उशिरा कामावर येत असल्याचे आढळले आहे. आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनीही त्याची गंभीर दखल घेतली असून, लेटलतिफांच्या वेतनातून पैशांची कपात करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. 

तुकाराम मुंढे यांनी पालिका आयुक्त म्हणून धडाकेबाज कारवाई करून कर्मचारी-अधिकाऱ्यांना शिस्त लावली होती. ती शिस्त कायम राहावी, नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात याकरिता रामास्वामी यांनी तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. 

महापालिकेतील कायम आस्थापनेवरील 3 हजार कर्मचारी आणि अधिकारी तसेच कंत्राटी 5 हजार 700 कर्मचारी व अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी त्यांना "जीपीएस'ची मनगटी यंत्र दिली आहेत. "जीओ फेन्सिंग ऍण्ड ट्रॅकिंग' या यंत्रणेत आहे. त्यामुळे कर्मचारी, अधिकारी त्याची नियुक्ती केलेल्या ठिकाणी निश्‍चित समयी आहे किंवा नाही हे थेट पाहता येणार आहे. तसेच प्रत्यक्ष कर्मचाऱ्याला काम करताना पाहण्याची व्यवस्थाही यंत्रात असलेल्या उच्च दर्जाच्या कॅमेऱ्यामुळे आहे. कर्मचारी वेळेनंतर अथवा कामाची वेळ संपण्याआधीच कार्यक्षेत्रातून बाहेर गेल्यास पालिकेत तयार केलेल्या नियंत्रण कक्षात नोंद होत आहे. या यंत्राद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, सरासरी 28 टक्के कर्मचारी उशिरा कामावर येत असल्याचे उघडकीस आले आहे. 

या माहितीनंतर उशिरा कामाच्या ठिकाणी येणाऱ्यांची माहिती गोळा करून त्यांची तासानुसार वेतन कपात करण्यात येणार आहे. 

महापालिकेने बेलापूर विभागातील सफाई कर्मचारी, मुकादम, अधिकारी, तसेच पालिकेच्या वाशीतील रुग्णालयातील डॉक्‍टर, एनएमएमटी कर्मचारी-अधिकारी आदी 1200 जणांकडे ही यंत्रे देण्यात आली आहेत. बेलापूर विभागातील 550 सफाई कर्मचाऱ्यांच्या हातावर ती आहेत. 

डॉक्‍टरांनाही  पालिकेच्या वाशीतील रुग्णालयातील अनेक फावल्या वेळेत खासगी रुग्णालयांमध्ये काम करत होते; परंतु "जीपीएस' घड्याळांमुळे त्यांच्यावर प्रशासनाची नजर असल्याने त्यांची अडचण झाली आहे. 

17 कंत्राटदारांवर कारवाई 
बेलापूर विभागातील काही सफाई कर्मचारी वेळेआधीच घरी जात असल्याचे "जीओ फेन्सिंग ऍण्ड ट्रॅकिंग' यंत्रणेमुळे निदर्शनास आले. या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या 17 कंत्राटदारांना प्रतिकर्मचारी शंभर रुपये असा दंड ठोठावण्यात आला आहे. लेटलतीफ कर्मचाऱ्यांचे वेतन कंत्राटदारांच्या बिलातून कपात करण्यात येणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे देण्यात आली. 

पालिका प्रशासनाच्या कारभारात सुसूत्रता आणणे. कर्मचारी, अधिकारी त्यांची नियुक्त केलेल्या ठिकाणी असावे, यासाठी ही यंत्रणा आहे. पुढील महिन्यापासून कामाच्या वेळा न पाळणाऱ्यांची वेतन कपात करण्यात येणार आहे. 
- डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त, पालिका 

Web Title: The decision of the deduction of the wages of the Municipal Corporation employee