दीपक मानकर यांच्या अडचणींत वाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

मुंबई - पुण्यातील नगरसेवक दीपक मानकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयातील खंडपीठाने शुक्रवारी (ता. 15) पुन्हा नकार दिला. न्या. अजय गडकरी यांनी या याचिकेवर सुनावणी घेण्यास असमर्थता दाखवली. सोमवारी न्या. साधना जाधव यांनी सुनावणीस नकार दिल्याने मानकर यांनी न्या. गडकरी यांच्या खंडपीठासमोर याचिका सादर केली होती; परंतु त्यासही नकार मिळाल्याने त्यांना पुन्हा नव्याने याचिका करावी लागेल.

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप हे मानकर यांच्याकडे नोकरीस होते. जगताप यांनी दोन जून रोजी घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. जगताप यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत दीपक मानकर, विकसक सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्यासह पाच जणांचा उल्लेख करत त्यांना जबाबदार धरले होते. याप्रकरणी पोलिसांनी अटकसत्र सुरू केल्याने मानकर यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.

जगताप हे गेली अनेक वर्षे दीपक मानकर यांचे जमिनीचे व्यवहार पाहात होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून रास्ता पेठेतील समर्थ पोलिस ठाण्यासमोरील जागेवरून दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यासाठी मानकर, कर्नाटकी, भोळे यांच्या अनेक वेळा बैठकाही झाल्या होत्या. जागेचा ताबा सोडण्यासाठी मानकर जगताप यांच्यावर दबाव टाकत होते. दरम्यान, जगताप यांनी खंडणी उकळण्यासाठी आत्महत्येची धमकी दिली होती. त्याबद्दल एक जूनलाच पोलिस आयुक्तालयात अर्ज दिल्याचे मानकर यांनी अर्जात म्हटले आहे.

Web Title: deepak mankar in problem crime