स्थायी समिती सभापतिपदी डोंबिवलीचे दीपेश म्हात्रे 

स्थायी समिती सभापतिपदी डोंबिवलीचे दीपेश म्हात्रे 

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक गुरुवारी पार पडली. या पदासाठी डोंबिवलीतील शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची निवड निश्‍चित होती. अखेर गुरुवारी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. नाराज सदस्य शिवसेनेसोबतच असल्याचा दावा म्हात्रे यांनी केला. 

स्थायी समिती सभापतिपदावरून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. सेनेच्या कल्याणमधील दोन नगरसेवकांनी नाराज होत आपल्या स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामाही दिला. त्यामुळे ही निवडणूक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, नाराज सदस्यांची आपण भेट घेतली आहे. ते सेनेसोबतच आहेत, असा दावा दीपेश म्हात्रे यांनी केला. वाहतूक कोंडी, स्वच्छता, आरोग्य या समस्यांकडे प्रामुख्याने आपण लक्ष देणार असल्याचे मत म्हात्रे यांनी या वेळी व्यक्त केले. करवसुलीच्या माध्यमातून उत्पन्नवाढीला प्राधान्य दिले जाईल व यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल. तसेच 27 गावांबाबत दुजाभाव न ठेवता येथेही विशेष लक्ष दिले जाईल, असेही म्हात्रे म्हणाले. दरम्यान, या निवडणुकीत पिठासन अधिकारी म्हणून मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी काम पाहिले. 

दुसऱ्यांदा सभापतिपद 
याअगोदर सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याकडे स्थायी समिती सभापतिपद होते. त्यानंतर भाजपनेही डोंबिवलीतील नगरसेवक राहुल दामले यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ घातली. सभापतिपद पुन्हा सेनेकडे असल्याने यंदा हा मान कल्याणला मिळेल, अशी चर्चा होती; मात्र डोंबिवलीचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सेनेत नाराजी उफाळून आली. दीपेश म्हात्रे हे दुसऱ्यांदा सभापतिपद भूषवत आहेत. 

महिला व बालकल्याण सभापतिपदी चौधरी 
महिला व बालकल्याण विभागाच्या सभापतिपदी भाजप नगरसेविका रेखा चौधरी यांची निवड झाली. आजपर्यंत हळदी कुंकू, सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे यावर वारेमाप खर्च केला गेला आहे. त्यामुळे यापुढे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण करण्याचे आव्हान चौधरी यांच्यासमोर असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com