माकडे मागे लागल्याने पळताना हरणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

मुंबई - आरे वसाहतीत ऑटोरिक्षाच्या धडकेने हरणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी भांडुप परिसरातही एक हरण मृतावस्थेत सापडले. आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे.

मुंबई - आरे वसाहतीत ऑटोरिक्षाच्या धडकेने हरणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी भांडुप परिसरातही एक हरण मृतावस्थेत सापडले. आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मुलुंड सीमेलगत एक हरण खूप उंचावरून खाली पडल्याचे रहिवाशांना दिसले. मुलुंड पश्‍चिमेकडील अमरनगरमधील शंकर टेकडी येथील रहिवाशांनी याबाबतची माहिती स्थानिक प्राणीप्रेमींना दिली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन अधिकाऱ्यांना हे कळताच तुळशी भागात गस्त घालणाऱ्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली. त्यांना हरण मृतावस्थेत सापडले. स्थानिकांनी सांगितले, की या हरणाच्या मागे काही माकडे धावत होती. वेगात पळत असताना पुढच्या दरीची कल्पना हरणाला आली नाही. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय रुग्णालयात हरणाचे विच्छेदन करण्यात आले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार ते पाच वर्षांचे मादी हरण उंचावरून पडल्याने त्याच्या छातीत अंतर्गत रक्तस्त्राव झाला व त्याचा मृत्यू झाला.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुळशी विभागाजवळ हरणे आणि सांबरांची संख्या मोठी आहे. हरण हा लाजाळू प्राणी आहे. जोराच्या आवाजानेही मानसिक धक्का बसून हरणाचा मृत्यू ओढवतो. जंगलातही कित्येकदा एखादा प्राणी मागे लागल्यानंतर घाबरून हरणाचा मृत्यू होतो. मुलुंडमध्येही असाच प्रकार घडला असावा.
- कृष्णा तिवारी, प्रमुख, फॉरेस्ट अँड वाइल्डलाइफ कॉन्झर्व्हेशन सोसायटी

Web Title: deer death by monkey chase