नव्या मोनोच्या आगमनाला आचारसंहितेचा फटका 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा फटका मोनो रेलच्या खरेदीलाही बसला आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुंबईकरांना नवी मोनो मिळणार नाही.

मुंबई : लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा फटका मोनो रेलच्या खरेदीलाही बसला आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुंबईकरांना नवी मोनो मिळणार नाही. वडाळा येथील मोनोच्या डेपोत अतिरिक्त "रोलिंग स्टॉक' आणि इंजिनाच्या सुट्या भागांच्या खरेदीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) यापूर्वीच निविदा काढल्या आहेत, परंतु नवी मोनो मुंबईत दाखल होण्यासाठी आणखी काही काळ लागेल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

प्रत्येकी 40 कोटी रुपयांच्या पाच नव्या मोनो काही दिवसांत खरेदी करण्याचा एमएमआरडीएचा विचार आहे. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे नव्या गाड्यांची खरेदी करता येत नाही. पहिल्या चार लोकलसाठी लार्सन अँड टुब्रो व मलेशियाच्या स्कोमी कंपनीसोबत करार करण्यात आला होता.
 
जलद सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला पूरक म्हणून अतिगर्दीच्या आणि चिंचोळ्या भागात मोनोरेल प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने सप्टेंबर 2008 मध्ये घेतला. या कामासाठी एमएमआरडीएला नोडल एजन्सी म्हणून नेमण्यात आले. मोनोचा वडाळा ते चेंबूर हा 8.80 किलोमीटरचा पहिला टप्पा 2 फेब्रुवारी 2014 रोजी सुरू झाला; तर वडाळा ते संत गाडगे महाराज चौक हा 11.20 किलोमीटरचा दुसरा टप्पा मार्च 2019 मध्ये कार्यान्वित झाला.

उन्नत मार्गावरून मोनोरेल ताशी 30 ते 80 किलोमीटर वेगाने धावू शकते. मोनोची तासाला 7500 प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता आहे. सध्या चार मोनो धावत असून, त्यातील दोन गाड्या दुरुस्तीसाठी डेपोमध्ये आहेत. त्यामुळे 20 ते 25 मिनिटांनी एक अशा प्रकारे मोनो सेवा सुरू आहे. 

एकूण 17 गाड्यांची आवश्‍यकता 
मोनोरेल्वेची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी एकूण 17 गाड्यांची (रेक) आवश्‍यकता आहे. या 17 गाड्या पूर्णपणे सुरू झाल्यावर पाच मिनिटांना एक मोनो धावेल असा अधिकाऱ्यांना विश्‍वास आहे. 

 

Web Title: Delay for purchase Mono Train due to Code of Conduct