म्हाडा इमारतींची थकबाकी दंड, व्याज माफ करण्याची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

मुंबई - शहरातील जुन्या म्हाडा वसाहतींमधील गृहनिर्माण संस्थांच्या अनेक वर्षे थकलेल्या भुईभाड्याचे व्याज आणि दंड माफ करावा, अशी जोरदार मागणी शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्यासह जवळपास सर्वच सदस्यांनी बुधवारी (ता. 11) विशेष समितीपुढे केली. त्यामुळे दंड आणि व्याज माफ होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

मुंबई - शहरातील जुन्या म्हाडा वसाहतींमधील गृहनिर्माण संस्थांच्या अनेक वर्षे थकलेल्या भुईभाड्याचे व्याज आणि दंड माफ करावा, अशी जोरदार मागणी शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्यासह जवळपास सर्वच सदस्यांनी बुधवारी (ता. 11) विशेष समितीपुढे केली. त्यामुळे दंड आणि व्याज माफ होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

गृहनिर्माण संस्थांची सुमारे 20 वर्षे भुईभाडे, अकृषिकर व सेवाकर आदी थकबाकी आहे. मुद्दल, व्याज आणि दंड मिळून ती रक्कम 50 लाख ते एक कोटींच्या घरातही गेली आहे. 20 वर्षे थकबाकी वसूल करण्यासाठी म्हाडानेही प्रयत्न केले नाहीत व संस्थांनीही ती रक्कम भरली नाही; मात्र थकबाकी राहिल्याने जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात अडचणी येत आहेत. ज्या इमारतींची थकबाकी आहे त्यांना म्हाडातर्फे पुनर्विकासासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले जात नाही. रक्कम फार मोठी असल्याने या संस्थांना ती भरणेही कठीण जात आहे. त्यामुळे या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी, या प्रश्‍नाचा अभ्यास असलेल्या आमदारांची समिती सरकारने नियुक्त केली आहे. 

20 वर्षे थकबाकी कायम राहण्यात प्रशासनाचा तसेच त्या इमारतींच्या तेव्हाच्या पदाधिकाऱ्यांचाही वाटा आहे. त्याचा भार आताच्या सदस्यांवर टाकणे योग्य होणार नाही. यापैकी अनेक इमारती जुन्या झाल्या असून त्यांच्या पुनर्विकासात या प्रश्‍नामुळे अडथळे येत आहेत, असे कुर्ला येथील शिवसेना आमदार कुडाळकर यांनी आजच्या बैठकीत दाखवून दिले आणि या रकमेवरचे दंड, व्याज माफ करण्याची मागणी केली. त्यास आशीष शेलार, सुनील प्रभू, सुनील राऊत, भाई गिरकर आदी जवळपास सर्वच सदस्यांनी पाठिंबा दिला. मुद्दल रक्कम रहिवाशांनी भरलीच पाहिजे यावर सर्वांचे एकमत होते. मात्र दंड, व्याज माफ केल्यास सरकारवर नेमका किती बोजा पडेल याची माहिती घेऊन पुढील बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्याचे ठरले. गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता या समितीचे अध्यक्ष आहेत.

Web Title: demand for excise dues for the buildings of MHADA