फॅन्सी फटाक्‍यांना वाढती मागणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

सोशल मीडियावरून चिनी वस्तूंविरोधात होत असलेल्या प्रचारामुळे यंदा चिनी फटाक्‍यांची मागणी घटली आहे. तसेच अनेक व्यापाऱ्यांनी चिनी फटाके विक्रीसाठी ठेवलेले नाहीत. देशात बनवलेले फटाके घेण्याकडेच अनेकांचा कल आहे.

भायखळा - दिवाळीत बच्चे कंपनीला विशेष आकर्षण असते ते फटाक्‍यांचे... यंदा फटाक्‍यांच्या किमतीत वाढ झाली असली तरीही नागरिकांचा फटाके खरेदीचा उत्साह कायम आहे. मात्र, मोठा आवाज करणाऱ्या फटाक्‍यांची मागणी कमी झाली असून, फॅन्सी आणि आतषबाजी करणाऱ्या फटाक्‍यांची मागणी वाढली आहे. लालबाग येथील होलसेल फटाके विक्रेत्यांकडे खरेदीसाठी गर्दी होत आहे. अधिकृत परवाने असलेल्या 250 दुकानांत मोठ्या प्रमाणात फटाकेविक्री होते; तर छोट्या दुकानांची संख्या 40 पर्यंत आहे.

बाजारात यंदा फॅन्सी फटाक्‍यांची क्रेझ आहे. सर्वच कंपन्यांनी फटाक्‍यांच्या पॅकिंगकडे विशेष लक्ष दिले आहे. बॉक्‍सवर सेलिब्रिटींची छायाचित्रे आहेत. जुन्या सेलिब्रिटींऐवजी ऐश्वर्या, करीना, दीपिका, बिग बी, आर्ची-परश्‍या व विदेशी मॉडेल्सचे फोटो बॉक्‍सवर दिसत आहेत. तसेच बच्चेकंपनीला आकर्षित करणारे मिकी माऊस, चार्ली चाप्लीन यांसारख्या कार्टून चित्रांसह त्यांची नावेही फटाक्‍यांना दिली आहेत. बच्चेकंपनीही त्याकडे आकर्षित होत आहे. आवाज करणाऱ्या फटाक्‍यांऐवजी फुलबाजा, पाऊस, भुईचक्र अशा फटाक्‍यांना जास्त मागणी आहे. या फटाक्‍यांमध्येही विविधता दिसत आहे.

सोशल मीडियावरून चिनी वस्तूंविरोधात होत असलेल्या प्रचारामुळे यंदा चिनी फटाक्‍यांची मागणी घटली आहे. तसेच अनेक व्यापाऱ्यांनी चिनी फटाके विक्रीसाठी ठेवलेले नाहीत. देशात बनवलेले फटाके घेण्याकडेच अनेकांचा कल आहे.

किमतीत 20 टक्‍क्‍यांची वाढ
महागाईने फटाक्‍यांच्या किमतीत सुमारे 20 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. तरीही ग्राहकांनी आवरता हात घेतलेला नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. होलसेल बाजारात स्वस्तात मिळणाऱ्या फटाक्‍यांमुळे तेथे गर्दी होत आहे. भुईचक्राच्या बॉक्‍सची किंमत 50 ते 350 रुपयांपर्यंत आहे; तर पाऊस आणि रॉकेट व पॅराशूट रॉकेटची किंमत 60 ते 400 रुपयांपर्यंत आहे. पॅराशूट रॉकेटला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

फायटर हा नवीन फटाका बाजारात आला असून, हा पेटवल्यावर असे वाटते की दोन फटाके एकमेकांसोबत फाईट करत आहेत. त्यांच्या एका बॉक्‍सची किंमत 350 च्या पुढे आहे; तर सुईमुई ही नवीन फटाकी आली असून, ती पेटवल्यावर फुटत नसून फक्त सुईमुई, असा आवाज करते. त्यांच्या बॉक्‍सची किंमत 250 च्या पुढे आहे.

Web Title: Demand for fancy fireworks