धोकादायक वळण सुरळीत करण्याची मागणी, अन्यथा रास्तारोको

सनी सोनावळे
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

टाकळी ढोकेश्वर : कल्याण महामार्गावरील कर्जुले हर्या (ता.पारनेर) घाटात असलेले धोकादायक वळण सुरळीत करण्याची मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले.

टाकळी ढोकेश्वर : कल्याण महामार्गावरील कर्जुले हर्या (ता.पारनेर) घाटात असलेले धोकादायक वळण सुरळीत करण्याची मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले.

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, संतोष कोरडे, रोहन आंधळे, ज्ञानेश्‍वर गागरे, अर्जुन रोकडे, सचिन मुटकुळे आदी उपस्थित होते. कल्याण-विशाखापट्टणम महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या रस्त्याच्या कामाच्या अनुषंगाने अत्यंत धोकादायक अशी वळणे बांधकाम विभागाने काढली आहे. यासाठी खासगी जमिनीचे भूसंपादन करण्यात आले आणि संबंधित शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देखील देण्यात आली. त्यानुसार या रस्त्याचे कल्याण ते नगर अशा मार्गावरील काम पूर्ण अवस्थेत येत आहे. मात्र या घाटाच्या माथ्यावर अत्यंत धोकादायक असे वळण अद्यापही कायम असून, यामुळे काही लहान-मोठे अपघात देखील घडले आहे. हे वळण काढण्यासाठी प्रभारी बांधकाम विभागाने मार्किंग केली होती.

सदर वळण काढून रस्ता सरळ करण्यासाठीची जागा वनखात्याची असल्याने या जागेचा भूसंपादन करण्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाने वन विभागाला दिला. त्या अनुषंगाने कोणतेही कार्यवाही झालेली नाही. बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनीने सदरचे धोकादायक वळण कायम ठेऊन हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. गेल्या एक महिन्यात या धोकादायक वळणावर तब्बल 20 ते 25 अपघात झाले असून यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कल्याण महामार्गावरील कर्जुले हर्या घाटात असलेला धोकादायक वळण मृत्यूचा सापळा बनला आहे. आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास रास्तारोको करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Web Title: Demand to make a dangerous turn, otherwise agitation