दिवाळीसाठी रेडिमेड पदार्थांना वाढती मागणी

दिवाळीसाठी रेडिमेड पदार्थांना वाढती मागणी
दिवाळीसाठी रेडिमेड पदार्थांना वाढती मागणी

नवी मुंबई : दिवाळी जवळ आली की घराघरातून भाजणीचा खमंग वास दरवळू लागतो. चकलीच्या भाजणीबरोबरच रवा, बेसन, करंजीचे पुरण तयार करण्यात गृहिणी मग्न होऊन जातात. नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर राहणाऱ्या महिलांना मात्र कामाच्या व्यापातून फराळ तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने त्यांचा कल रेडिमेड फराळ विकत घेण्याकडे कल वाढत आहे. त्यातही घरगुती चवीचा फराळ घेण्याला महिला अधिक प्राधान्य देत असल्याने गृहोद्योग करणाऱ्या अनेक महिलांना अर्थार्जनाची चांगली संधी मिळते. 

गेल्या आठवड्यापासूनच रेडिमेड फराळाचे दरपत्रक व्हॉट्‌सॲप, फेसबुकवरील ग्रुप्सवर फिरत आहेत. तसेच घरोघरी दरपत्रकेही वाटली जाऊ लागली आहेत. दरवर्षी तयार फराळाची वाढती मागणी लक्षात घेऊन बचतगटाच्या; तसेच घरगुती फराळ बनवणाऱ्या महिलांनीही तयारी सुरू केली आहे. कामोठे येथील नेहा कर्णिक सांगतात, दिवाळीचा फराळ म्हटले की, तो घरच्या चवीचा असावा, असा नोकरदार महिला आणि कुटुंबातील सदस्यांचाही हट्ट असतो. त्यामुळे बाहेर दुकानातून फराळ घेण्यापेक्षा तो गृहोद्योग करणाऱ्यांकडून घेण्याला पसंती दिली जाते. गेली पाच वर्षे हा व्यवसाय आवड म्हणून करते. गेल्या वर्षी जवळपास ५० किलोच्या फराळाची मागणी होती. आता चांगली मागणी येण्यास सुरुवात झाली आहे. 

खारघर येथील कविता गोलांडे यांनी सांगितले की, महिनाभर आधीच दिवाळी फराळ तयार करण्यासाठी सुरुवात करते. लोकांना घरगुती चव हवी असते. दिवाळी जवळ आली की मागणीचा ओघ वाढतो. अनेकदा मला मागणी पूर्ण करता येत नाही. जवळपास ६० किलोपर्यंतची ऑर्डर माझ्याकडे असते. 

फराळाच्या दरात वाढ नाही
फराळाच्या दरात यंदा वाढ पाहण्यास मिळत नाही. गेल्या वर्षीही भाजणीची चकली ४०० रुपये किलोने उपलब्ध होती. या वर्षीही त्याच दराने उपलब्ध आहेत. पोह्यांचा चिवडा २२५ रुपये ते काजू व इतर सुका मेवा असलेला ३७० रुपये किलो, शंकरपाळी २२५ ते ३५० रुपये किलो, बेसन लाडू ३० रुपये प्रति नग, रवा लाडू २५ रुपये प्रति नग, अनारसे २५ ते ३० रुपये प्रति नग, करंजी २२ ते ३० रुपये प्रति नग, बुंदी लाडू ५०० रुपये किलो, मूग लाडू, ७५० रुपये किलो, रिच आयर्न लाडू ८५० रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. याशिवाय ८०० ते १५०० रुपयांपर्यंत कॉम्बो पॅकही उपलब्ध आहे.

चकली, अनारशाला पसंती
चकली कडक होणे किंवा कुस्करणे असे प्रकार घडत असल्याने नोकरदार महिलांसोबत गृहिणीदेखील चकली बाहेरून विकत घेणेच पसंत करतात. त्यामुळे  ३० ते ४० किलोची चकलीचीच मागणी पाहण्यास मिळते. त्यापाठोपाठ अनारशांनाही पसंती दर्शवली जात असल्याचे सुनीता खाडे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com