यंदाची दिवाळी पर्यावरणस्नेही कंदिलांची

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

पारंपरिक अाणि बांबूच्या कंदिलांना ग्राहकांकडून मागणी

मुंबई : दिवाळीसाठी जय्यत तयारी सुरू झाली असून विविध आकर्षक साहित्यांनी बाजार सजला आहे. दादर, माहीम, लालबाग, परळ आदी परिसरातील कंदील गल्ली उजळून निघाली आहे. विशेष म्हणजे पर्यावरणस्नेही कंदील खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल आहे. पारंपरिक कंदिलांना जास्त मागणी आहे. बांबूपासून बनवण्यात आलेले कंदीलही ग्राहकांचे लक्ष वेधत आहेत. कंदिलाच्या किमती दोनशे ते हजार रुपयांपर्यंत आहेत.

पारंपरिक आकाश कंदिलांना यंदा वेगळा साज दिला गेला आहे. कागदाऐवजी शाईन, नक्षीदार जाळी पेपर अाणि प्रिटेंड डिझाईनच्या पेपरने कंदील तयार करण्यात अाले आहेत. काही आकाश कंदिलांना बांबूच्या चटईची किनार आहे. बांबू आणि कापड यांच्यापासूनही कंदील बनवले गेले आहेत. एखाद्या घरातील शोच्या दिव्याप्रमाणे बांबूचे कंदील दिसतात. ते ३०० ते ७०० रुपयांपर्यंत विक्रीस आहेत. पारदर्शी नक्षीकाम केलेले, कागदापासून बनवलेले पारंपरिक आकाश कंदील ग्राहकांना विशेष आकर्षित करत आहेत.

रेशमी धाग्याप्रमाणे दिसणारे कपड्याचे भारतीय बनवटीचे कंदीलही बाजारात आहेत. त्यांची किंमत ३०० ते ३५० रुपये आहे. प्लास्टिकच्या चिनी बनवाटीच्या कंदिलांना मागणी कमी आहे. माटुंगा सिटीलाईट  परिसरातील कंदील गल्ली पारंपरिक आकाश कंदिलांनी बहरली आहे. 

मातीच्या कंदिलांचेही आकर्षण
धारावीच्या कुंभारवाड्यात मातीपासून बनवलेले कंदील विक्रीस आहेत. त्यावर जाळीदार नक्षीकाम केले असून आकर्षक रंगसंगतीने त्याची सजावट केली आहे. दिवा लावल्यास कंदिलावर करण्यात आलेल्या नक्षीची सावली विलोभनीय दिसते. कंदिलाची किंमत ५०० ते ६०० रुपये आहे. असा कंदील घरात वॉलपीस म्हणूनही वापरता येतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demand for traditional and ecofriendly kandil in mumbai