भाषण प्रभुत्व असणाऱ्याला जगभरात मागणी

भाषण प्रभुत्व असणाऱ्याला जगभरात मागणी
भाषण प्रभुत्व असणाऱ्याला जगभरात मागणी

मुंबई : ‘बोलणाऱ्यांची मातीही विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं सोनही विकलं जात नाही, त्यामुळे भाषणावर प्रभुत्व असणाऱ्याला जगभरात मागणी असते’, असे मत भाषण कला प्रशिक्षक उल्हास कोटकर यांनी व्यक्त केले. वाशी येथील सेक्‍टर ७ मधील मॉर्डन स्कूलमधील माध्यमिक शाळेत ‘सकाळ’ वृत्तसमूहातर्फे ‘भाषण व संभाषण’ या विषयावर आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात विद्यार्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुमित्रा भोसले, शिक्षक ए. बी. वाघ, शिक्षिका एम. के. मोरे, एस. एस. पाटील, एस. एम. पाटील, गजानन शिंदे, एम. डी. पट्टेकरी व व्ही. जी. कुडावकर उपस्थित होते.

बोलण्याची कला म्हणजेच ‘भाषणकला’ ही अनेकांना बिलकुल अवगत नसते. मोठ्या जनसमुदायासमोर बोलण्याची वेळ येते, तेव्हा तर परिस्थिती आणखीनच वाईट होते. माईकसमोर आल्यानंतर दरदरून घाम फुटतो, घशाला कोरड पडते, पोटात गोळा येतो आणि शब्दच बाहेर पडत नाहीत. या सगळ्यांवर मात करून एक चांगला वक्ता कसा बनायचं, लोकांना जिंकून प्रभावी भाषण कसे करायचे, त्यासाठी भाषणाची तयारी कशी करायची; अशा अनेक विषयांची माहिती त्यांनी या वेळी उपस्थितांना दिली.  

या वेळी उल्हास कोटकर यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना सांगितले, की भाषणामध्ये शब्द, देहबोली व आवाज महत्त्वाचा आहे. भाषण करताना एका जागी उभे राहून न बोलता, हातवारे करून प्रेक्षकांकडे पाहून बोलावे. उत्तम वक्ता बनण्यासाठी चौफेर वाचन, चांगले चित्रपट व नाटक पाहणे आवश्‍यक असून, यू ट्युबवर भरपूर भाषण ऐकणे व विशेष म्हणजे सातत्याने सराव करत राहणे आवश्‍यक आहे, असा कानमंत्र त्यांनी विद्यार्थांना दिला. 

त्याचप्रमाणे भाषण तयार कसे करावे, भाषणाची भीती मनातून काढून कशी टाकायची, भाषण करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, व्यासपीठावर येऊन न घाबरता आपले विचार प्रभावीपणे कसे मांडायचे, प्रभावी संभाषण कौशल्यातून यशाची शिखरे कशी गाठायची; या व अशा अनेक विषयांवर त्यांनी विद्यार्थांना प्रात्यक्षिकासंह मार्गदर्शन केले.

सकाळ वृत्तसमूहाचा असलेला भाषण व संभाषण हा उपक्रम स्तुत्य असा उपक्रम आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थांची व्यासपीठावर बोलण्याची भीती संपून ते उत्तम वक्ते बनू शकतात. आजच्या परिस्थितीमध्ये वक्‍त्यांची मागणी वाढत असून, त्यातून रोजगारांची संधीदेखील उपलब्ध होत आहे.
- सुमित्रा भोसले, मुख्याध्यापिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com