लोकशाहीचा अनोखा प्रयोग

विष्णू सोनवणे - सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

लोकशाहीचा प्रयोग यशस्वी झाल्यास उमेदवार निवडीचे ते ‘मॉडेल’ होऊ शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले...

मुंबई - ‘मिशन २०१७- मैदान में, संविधान के सन्मान में’ असा नारा देत जाती-धर्मांच्या भिंती तोडून विक्रोळी पार्कसाईट येथील नागरिक एकत्र आले आहेत. या विभागातील दोन प्रभागांमध्ये नागरिकांच्या पसंतीचे उमेदवार देण्यासाठी काही तरुण अडीच वर्षांपासून प्रयत्न करत होते. त्यांना यश आले. येथून नागरिकांच्या पसंतीचे उमेदवार देऊन लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेत नवा पायंडा पाडला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास उमेदवार निवडीचे ते ‘मॉडेल’ होऊ शकते, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पार्कसाईट परिसरातील दोन्ही प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित आहेत. यातील १२४ मधून ललिता तांबे, तर प्रभाग क्रमांक १२३ मधून सुनीता जाधव यांच्या उमेदवारीला नागरिकांची पसंती मिळाली आहे. त्यांच्या प्रचाराचा सर्व खर्चही नागरिकच वर्गणी काढून करणार आहेत. निवडणुकीत लोकप्रतिनिधी, मंत्री यांच्या नातेवाइकांनाच उमेदवारी मिळते. निवडून आल्यानंतर ते स्थानिक प्रश्‍नांशी संबंधच नसल्यासारखे वागतात. यात निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. उमेदवार निवडीची ही पारंपरिक पद्धत बदलण्यासाठी विक्रोळी पार्कसाईटमधील समविचारी तरुण एकत्र आले. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी अडीच वर्षांपासून ‘संविधान जागृती अभियान’ सुरू केले. याअंतर्गत त्यांनी या विभागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरी भेटीगाठी सुरू केल्या. सर्व जाती-धर्माच्या लोकांना त्यांनी आपली भूमिका पटवून दिली. त्यासाठी सोसायट्यांचे मतदान घेतले. त्याला सर्वांचाच चांगला प्रतिसाद मिळाला. मतदानातून दोन उमेदवार निवडण्यात आले. दोन्ही उमेदवार हे उच्चशिक्षित आणि चळवळीतील आहेत. त्यांना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांशी लढत द्यावी लागणार आहे. निवडणुकीसाठी ६० समन्वयकांची टीम तयार केली आहे. प्रचार यंत्रणेची जबाबदारी त्यांच्यावर असेल, अशी माहिती समन्वयक दीपक गायकवाड यांनी दिली. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनीही येथे भारिपचा उमेदवार दिलेला नसल्याची माहिती त्यांनी दिली. माजी न्यायमूर्ती डी. के. सोनवणे, ब्रिगेडियर सुधीर सावंत, आनंद ओव्हाळ, ओबीसी नेते मारुती कुंभार, जयवंत हिरे आदींच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

लोकवर्गणीतून ११ लाख जमा
उमेदवाराने खर्च करायचा नाही. लोकांच्या पैशातून उमेदवार निवडायचा, असे ठरल्यामुळे स्थानिकांनी दोन्ही उमेदवारांसाठी आतापर्यंत सुमारे ११ लाखांची रक्कम वर्गणीतून जमा केली आहे. या पैशाचा विनियोग समन्वय समिती निवडणुकीसाठी करणार आहे. 

उमेदवारांशी करार
उमेदवारांसोबत निवडणूक करार करण्यात आला आहे. त्यानुसार त्यांना पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही. निवडून आल्यानंतर इतर पक्षांत जाता येणार नाही. सोसायट्यांतील समन्वयकांनी सुचवलेली विकासकामे करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

संविधान जागृती अभियान
विक्रोळी पार्कसाईटमधील समविचारी तरुण एकत्र आले. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी अडीच वर्षांपासून ‘संविधान जागृती’ अभियान सुरू केले. याअंतर्गत त्यांनी या विभागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरी भेटीगाठी सुरू केल्या. सर्व जाती-धर्मांच्या लोकांना त्यांनी आपली भूमिका पटवून दिली. त्यासाठी सोसायट्यांचे मतदान घेतले. त्याला सर्वांचाच चांगला प्रतिसाद मिळाला. मतदानातून दोन उमेदवार निवडण्यात आले.

Web Title: Democratic unique experiment