सानुग्रह अनुदानात वाढ करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

येत्या सर्वसाधारण सभेत पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा विषय पटलावर घ्यावा, अशी मागणी नवी मुंबई महापालिका कर्मचारी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचारी अधिकारी वर्गाला दरवर्षी दिवाळी सणाचे औचित्य साधून सानुग्रह अनुदान पालिकेकडून देण्यात येते; मात्र यंदा विधानसभा निवडणुका असल्यामुळे सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता आहे; तर स्थायी समिती व सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर सानुग्रह अनुदानाला मंजुरी देण्यात येते. त्यामुळे येत्या सर्वसाधारण सभेत पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा विषय पटलावर घ्यावा, अशी मागणी नवी मुंबई महापालिका कर्मचारी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नवी मुंबई महापालिकेकडून सानुग्रह अनुदानाचा विषय उशिराने स्थायी समिती व सर्वसाधारण सभेच्या पटलावर येत असल्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी झाल्यानंतर सानुग्रह अनुदान मिळते. दिवाळी झाल्यानंतर सानुग्रह अनुदान मिळत असल्याने कर्मचारी वर्गात नाराजी असते. आचारसंहितेमुळे स्थायी समिती व सर्वसाधारण सभा होणार नसल्याने येत्या सर्वसाधारण व स्थायी समितीत सानुग्रह अनुदानाचा विषय घेण्यात येण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. 

विधानसभा निवडणुकीमुळे सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागणार असल्याने, पालिका प्रशासनाने येत्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत प्रस्ताव पटलावर आणावा, तसेच सानुग्रह अनुदानात वाढ करावी.
- विजय पाटील, अध्यक्ष, नवी मुंबई महापालिका कर्मचारी अधिकारी संघटना.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demond of increase a generous grant