जिल्हा बॅंकांवरील निर्बंधांबाबत निर्णय नाहीच 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

मुंबई : केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर जिल्हा सहकारी बॅंकांवर घातलेल्या निर्बंधांबाबत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेच्या स्तरावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

मुंबई : केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर जिल्हा सहकारी बॅंकांवर घातलेल्या निर्बंधांबाबत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेच्या स्तरावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरातील दैनंदिन घडामोडींचा केंद्र सरकारकडून आढावा घेतला जातो. त्यासाठी केंद्रीय वित्त सचिव सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत असतात. महाराष्ट्रातील बहुतांशी ग्रामीण अर्थकारण हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांवर आधारलेले आहे. त्यामुळे राज्यात जिल्हा बॅंकांना जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती राज्य सरकारकडून सातत्याने केली जात आहे. मात्र, केंद्र सरकारने यासंदर्भात अद्याप तरी कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. 

दरम्यान, जुन्या पाचशेच्या नोटांद्वारे बियाणे खरेदीवरून राज्यातील महाबीजच्या विक्री केंद्रांवर आज दिवसभर गोंधळाची परिस्थिती होती. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून महाबीजला स्पष्ट आदेश दिल्यानंतर ही परिस्थिती नियंत्रणात आल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने सरकारी बियाणे खरेदी केंद्रांवर पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारण्याचा आदेश दिला आहे. राज्यात महाबीजच्या जिल्हा कार्यालयांच्या ठिकाणी बियाण्यांसाठी जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. त्यावरून आज महाबीजच्या अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम होता. रिझर्व्ह बॅंकेच्या नव्या निर्णयात सरकारी विक्री केंद्रांचा समावेश नसल्याच्या गोंधळातून दिवसभर याठिकाणी बियाण्यांची खरेदी-विक्री ठप्प होती. 

महाबीजची जिल्ह्याच्या ठिकाणी विक्री केंद्रे आहेत. बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना याठिकाणी जावे लागते. त्यात महाबीजने दिवसभर जुन्या नोटा न घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. शेवटी क्षत्रिय यांनी कृषी विभाग आणि महाबीजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून जुन्या पाचशेच्या नोटा घेण्याचा आदेश दिला. त्यानंतर महाबीजच्या अधिकाऱ्यांमधील संभ्रमावस्था दूर होऊन व्यवहार सुरळीत सुरू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसभर मनस्ताप सहन करावा लागला. 

खत, बियाण्यांच्या विक्रीत घट होणार 
नोटाबंदीच्या निर्णयाचा फटक्‍याने रब्बी हंगामातील खते आणि बियाण्यांच्या विक्रीत सुमारे वीस टक्‍क्‍यांची घट होण्याची शक्‍यता आहे. कृषी विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनीच याला दुजोरा दिला आहे. रब्बी हंगामात गहू, हरभरा, तूर, मूग आदी पिके घेतली जातात. रब्बी हंगामात बियाणे मागणी राज्यात 7 लाख 72 हजार क्विंटल बियाण्याची आवश्‍यकता आहे.

Web Title: Demonetisation : no decision on District Banks as of now