डेंगी अळ्यांवरून कल्याणमधील बिल्डरांना कारवाईचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत अनेक ठिकाणी नव्याने इमारतींची बांधकामे सुरू आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी परिसर स्वच्छतेची काळजी न घेतल्याने तेथे डेंगी अळ्या सापडत आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहत असलेल्या नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून यावर उपाययोजनेसाठी नवीन इमारत बांधकाम सुरू आहे, तेथे सर्व्हे करण्यात येणार आहे. जर या ठिकाणी डेंगीच्या अळ्या सापडल्या, तर संबंधित बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करण्याचे आदेश पालिका उपायुक्त उमाकांत गायकवाड यांनी दिले आहेत. 

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत अनेक ठिकाणी नव्याने इमारतींची बांधकामे सुरू आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी परिसर स्वच्छतेची काळजी न घेतल्याने तेथे डेंगी अळ्या सापडत आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहत असलेल्या नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून यावर उपाययोजनेसाठी नवीन इमारत बांधकाम सुरू आहे, तेथे सर्व्हे करण्यात येणार आहे. जर या ठिकाणी डेंगीच्या अळ्या सापडल्या, तर संबंधित बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करण्याचे आदेश पालिका उपायुक्त उमाकांत गायकवाड यांनी दिले आहेत. 

कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्या दालनात आज पार पडलेल्या बैठकीत संशयित डेंगी रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर उपाययोजनांसंदर्भात आढावा घेण्यात आला. या वेळी कल्याण पूर्वसह पालिका हद्दीत संशयित डेंगी रुग्णांची संख्या वाढत आहे. वैद्यकीय आरोग्य विभाग, घनकचरा विभागामार्फत यावर उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, जंतुनाशक फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या द्रव्याचा दर्जा निकृष्ट असल्याने डेंगी अळ्यांवर त्याचा काहीच परिणाम होत नसल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत देण्यात आली. 

याची दखल घेत आयुक्त गोविंद बोडके यांनी अधिकारीवर्गाला प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उपायुक्त उमाकांत गायकवाड, वैद्यकीय आरोग्य विभाग उपायुक्त मिलिंद धाट, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पान पाटील यांनी कल्याण पूर्वमधील मेट्रो मॉलच्या मागील नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या परिसरासह अनेक भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी अनेक ठिकाणी पुन्हा डेंगी अळ्या सापडल्या. घनकचरा विभागातर्फे या ठिकाणी जंतुनाशक फवारणीही करण्यात आली. मात्र, या अळ्यांवर परिणाम होण्यास उशीर झाला. त्यामुळे औषधफवारणीचे प्रमाण वाढविण्याची सूचना या वेळी देण्यात आली. 

पुन्हा आढळल्या डेंगीच्या अळ्या 
कल्याण पूर्वमधील गणेशवाडीमध्ये वारंवार डेंगी अळ्या आढळत असल्याने पालिका आणि आरोग्य विभाग पथक सर्व्हे करत आहे. तरीही डेंगी अळ्या आढळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. या परिसरात आरोग्य शिबिराचे आयोजन करून नागरिकांची आरोग्य तपासणी करावी, अशी मागणी माजी नगरसेवक नितीन निकम यांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची आज भेट घेऊन केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dengue larvae alert to builders of Kalyan